• ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त
• १६ चोर्यांची संशयितांची कबुली
फोंडा, दि.१० (प्रतिनिधी): फोंडा पोलिसांनी घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या चोरट्याने फोंडा व इतर परिसरात सोळा चोर्या केल्याची कबुली दिली असून या चोरी प्रकरणी फोंडा पोलिसांनी आणखी दोघांना अटक करून सुमारे ८ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिली आहे.
संशयित समीर ऊर्फ सुलेमान शेख याने दिलेल्या माहितीवरून मल्लेश भीमसे येलवार (भेंडेवाडा सांगे) आणि चोरीचा ऐवज विकत घेणारा सोनार हिमांशू कालिकमलदार (वास्को) यांना अटक केली आहे. पारपतीवाडा बांदोडा येथील श्रीमती संगीता नाईक यांच्या घरात २४ जानेवारी रोजी संध्याकाळी ३ च्या सुमारास चोरी झाली होती. तसेच याच दिवशी तिस्क फोंडा येथील नागेश नाईक यांच्या घरातही दिवसाढवळ्या चोरी झाली होती. दोन्ही चोर्यांत मिळून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळविण्यात आला होता. या चोरी प्रकरणातील दोघे चोरटे चंदेरी रंगाच्या मार्टिझ कारमधून पळून गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी वाहतूक खात्यात चौकशी करून सविस्तर माहिती मिळविली. ह्या प्रकारची कारगाडी गोकाक कर्नाटक येथील एका व्यक्तीला विकण्यात आली आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक सचिन लोकरे यांनी गोकाक कर्नाटक येथे जाऊन चौकशी केली असता सदर कारगाडी चोरीप्रकरणात गुंतलेला समीर ऊर्फ सुलेमान शेख वापरत असल्याचे उघड झाले. त्यानंतर समीर बेळगाव येथे राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बेळगाव येथे सापळा रचून समीर याला ताब्यात घेतला, असे निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.
संशयित समीर याने सात घरफोड्या, चार सोनसाखळ्या हिसकावणे, एक अपहरण आणि केपे व मायणा कुडतरी येथे दरोडा घातल्याची माहिती उघड केली आहे. कुडचडे येथील श्री सातेरी मंदिर, दुर्भाट आडपई येथील साईबाबा मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरलेला ऐवज वास्कोतील सोनार हिमांशू याला विकण्यात येत होता. तसेच लोहार मल्लेश येलवार याने दरवाजे तोडण्याचे हत्यार बनवून दिले, अशी माहिती त्याने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर कारगाडीही जप्त केली आहे. तसेच २ किलो चांदी व ३०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणातील एक संशयित फरारी असून त्याचा शोध घेतला जात आहे. ह्या टोळक्याने गोवा आणि कर्नाटकात अनेक चोर्या केल्या आहेत. गोव्यात चोरी करून चोरटे कर्नाटकात पळून जात होते. काही दिवसांनी परत येऊन चोरी करायचे, असे निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी निरीक्षक श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लोकरे, शिपाई राजेश नाईक, जितेंद्र गावडे, महेश परब, सारंग ओपकर यांनी परिश्रम घेतले. उत्तर गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. चोरी प्रकरणाचा छडा लावणार्या पोलिस पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Friday, 11 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment