पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सिप्रियानो फर्नांडिस प्रकरणी गुन्हा विभागाने आज पणजी पोलिस स्थानकातील अनेक पोलिस अधिकार्यांविरोधात खून व पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्याखाली ‘एफआयआर’ नोंद केला आहे. उपविभागीय न्यायदंडाधिकार्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आधार घेऊन हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी दिली.
याप्रकरणी तीन पोलिस अधिकार्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. सिप्रियानोला पणजी पोलिस स्थानकात आणल्यावेळी तिथे ड्यूटीवर असलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिप्रियानोचा मृत्यू पोलिस कोठडीत होणे हा गंभीर गुन्हा आहे व त्यामुळे या प्रकरणाची जलदगतीने चौकशी केली जाईल, अशी माहितीही यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझिस करीत आहेत. हा ‘एफआयआर’ नोंद केला असला तरी त्यात संबंधित पोलिसांची नावे घातली नसून ती चौकशीअंती घातली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, सिप्रियानो याला पोलिस स्थानकात आणल्यापासून त्याचा मृत्यू होईपर्यंत जे कुणी अधिकारी व कर्मचारी ड्यूटीवर होते त्यासर्वांची चौकशी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिप्रियानोच्या मृत्यूबाबत शवचिकित्सा अहवालात त्याच्या डोक्यावर झालेल्या दुखापतीमुळेच त्याला मृत्यू आल्याचे म्हटले आहे. उपविभागीय न्यायदंडाधिकार्यांनीही आपल्या अहवालात या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ७ जानेवारी रोजी पोलिस स्थानकात आणलेल्या सिप्रियानोचा ८ रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या जबानीत पोलिसांकडून सिप्रियानो याला कोठडीत मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने पोलिस अधिकच गोत्यात सापडले आहेत. दरम्यान, सिप्रियानो याला अटक करण्यासाठी पोलिसांनी योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नसल्याचेही उपविभागीय न्यायदंडाधिकार्यांच्या अहवालात स्पष्ट झाल्याने हे प्रकरण पोलिसांवर शेकण्याचीच जास्त शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment