निरीक्षक सिद्धांत शिरोडकरांवर ‘विहिंप’चा ठपका
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
देशभरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना झोडपण्याचे सत्र सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून मडगाव येथील जयेश नाईक यांना एका खून प्रकरणात गोवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. मडगाव पोलिस स्थानकात निरीक्षक सिद्धांत शिरोडकर हे या षड्यंत्राचे ‘एजंट’ म्हणून काम करीत असून त्यांच्याकडून त्वरित या प्रकरणाचे तपासकाम काढून घेतले जावे, अशी जोरदार मागणी विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांताचे सहमंत्री ऍड. दीपक गायकवाड व बजरंग दलाचे कोकण प्रांत संयोजक शरद बिरासदार यांनी केली.
ते आज पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री राजू वेलिंगकर उपस्थित होते. जयेश यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केले.
न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगत ते म्हणाले की, निरीक्षक सिद्धांत शिरोडकर हे यापूर्वी वादग्रस्त ठरले आहेत. मडगाव येथे दहशतवादी शक्तीच्या विरोधात काम करणार्या जयेश नाईकला या प्रकरणात गोवून मतलबी व्यक्तींकडून शाबासकी मिळवण्याचा सिद्धांत शिरोडकर यांचा प्रयत्न आहे, असा आरोप यावेळी ऍड. गायकवाड यांनी केला. जयेश हा चौकशीसाठी उपलब्ध असताना त्याला फरार घोषित केले. शिवाय, एका वर्तमानपत्राने त्याच्याविरुद्ध लेखमालाच सुरू केली. कोणतीही गुन्ह्याची पार्श्वभूमी नसताना त्याला खून प्रकरणात आरोपी ठरवण्यात आले. पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन भावांना या प्रकरणात अटक केली. एकाच वर्तमानपत्राला माहिती पुरवण्यात आली आणि एकाच संघटनेच्या ९ कार्यकर्त्यांना चौकशीच्या नावाने ताब्यात घेऊन त्यांचा छळ करण्यात आला. त्यामुळे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या तपासाबद्दल संशय निर्माण होत असल्याची टीका ऍड. गायकवाड यांनी केली.
पोलिस आरोपपत्र सादर करीत नाही तोपर्यंत त्या प्रकरणाच्या तपासकामाची सर्व कागदपत्रे न्यायालयाची मालमत्ता असते. असे असताना न्यायाधीशांसमोर घेण्यात आलेल्या साक्षीची माहिती पोलिसांना एका वर्तमानपत्राला जाणूनबुजून पुरवली आणि संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.
जयेश हा लोकनेता आहे. मडगाव येथे उभे राहणार्या बेकायदा मदरसा विरोधात तो दंड थोपटून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. ६५० तरुणांना त्याने व्यसनमुक्त केले आहे. काही जणांच्या डोळ्यात हे खुपायला लागले. त्यामुळेच त्याला बदनाम करण्याचे हे कटकारस्थान आहे, असेही ते म्हणाले. निरीक्षक सिद्धांत यांना खरे आरोपी शोधून काढायचे नाहीत, असा आरोप त्यांनी शेवटी केला.
१९८४ मध्ये स्थापन झालेल्या बजरंग दलाचे काम सेवा, सुरक्षा आणि संस्कार देण्याचे आहे. राष्ट्र संरक्षणाचे काम बजरंग दलाकडून केले जाते, अशी माहिती यावेळी शरद बिरासदार यांनी दिली.
Sunday, 6 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment