निर्णयाशिवाय बैठक गुंडाळली
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासंबंधी निर्णय घेण्यासाठी आज (दि.७) सकाळी बोलावण्यात आलेल्या सभागृह समिती बैठकीत वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. महामार्गाच्या सध्याच्या आराखड्याला आक्षेप घेत श्री. सिक्वेरा यांनी नापसंती व्यक्त केली असता आलेमावबंधुंनी त्यांच्या या भूमिकेवरच नाराजी व्यक्त केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे अखेर ही बैठकच आटोपती घेणे भाग पडले, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग १७ व ४ (अ) चा आराखडा निश्चित करण्यासाठी आज सभागृह समितीची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या आराखड्याबाबत अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला. मुळात सुधारीत आराखड्याची कोणतीच माहिती अद्याप प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली नाही. या महत्त्वाच्या प्रकल्पाचा निर्णय घेण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाच्याबाबतीत जनतेची साथ देणारे वीजमंत्री सिक्वेरा यांनी या प्रकल्पाबाबत सरकारची भूमिका योग्य नसल्याचे सांगितले. लोकांना अंधारात ठेवून हा प्रकल्प लादला जात असल्याने लोकांचा सरकारवरील विश्वास ढळत असल्याची टिप्पणी करताच चर्चिल व ज्योकीम या आलेमांव बंधूंनी श्री. सिक्वेरा यांच्यावर टीकेची झोड उठवली. सिक्वेरा यांचा या आराखड्याबाबत आक्षेप होता तर त्यांनी हा विषय सभागृहात का उपस्थित केला नाही, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. यावेळी सिक्वेरा व आलेमावबंधू यांच्यात जोरदार आरोपप्रत्यारोप झाल्याने ही बैठक अखेर आटोपती घेणे भाग पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. यासंबंधी सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीची बैठक शनिवारी १२ रोजी होणार असून त्यात या विषयावर सखोल चर्चा केली जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
Tuesday, 8 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment