Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 February 2011

अशोक नाईक महापौर पदासाठीचे उमेदवार

भाजपसमर्थक ‘पणजी फर्स्ट’ पॅनलची घोषणा

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेतील सुप्रशासकरिता ‘पणजी फर्स्ट’ या नावाने भाजप समर्थक पॅनलची घोषणा आज येथे टाळ्यांच्या गजरात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात २५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून पॅनल सत्तेवर आल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न १८ कोटींवरून ८० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्‍वासन यावेळी पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिले. मात्र, हे उत्पन्न वाढवताना पणजीवासीयांच्या माथ्यावर कोणताही जादा कर लावला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील मराठा समाज सभागृहात घेतलेल्या या मेळाव्यात पणजी महापालिका उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर महापौरपदाचे उमेदवार अशोक नाईक, माजी पर्यटनमंत्री माथानी साल्ढाना, डॉ. रुफीन मोन्तेरो, आग्नेल सिल्वेरा, मिनीन डिक्रुज, पुंडलिक राऊत देसाई, केशव प्रभू व अन्य उमेदवार तथा कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
महापालिकेत सत्तेवर असलेल्यांनी गेल्या पाच वर्षांत केवळ ‘लूट’ केली. पणजीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी पणजीचा विचार करणार्‍यांनाच निवडून देणे महत्त्वाचे आहे, असे श्री. पर्रीकर म्हणाले. प्रभाग १४ मधून यापूर्वी उपमहापौर मिळाला होता. आता या प्रभागामधून महापौर मिळणार आहे. त्यामुळे या प्रभागातील लोकांनी ठरवायला पाहिजे की उपमहापौर पाहिजे की महापौर, असे श्री. पर्रीकर म्हणाले.
पणजीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आली आहे. सर्वांच्या बळावर आपण ही निवडणूक जिंकायची आहे. भ्रष्ट लोकांना पणजीपासून दूर ठेवण्यासाठी प्रचाराला उतरायला पाहिजे असे, यावेळी महापौरपदाचे उमेदवार अशोक नाईक म्हणाले.
पणजीच्या हिताला प्राधान्य ः अशोक नाईक
‘पणजी फर्स्ट’ पॅनलमध्ये निवडलेले उमेदवार हे पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांच्या हितासाठी वावरणारे आहेत. आपले पॅनल पणजीकरांच्या हिताला प्राधान्य देऊन कार्य करणार आहे. प्रगतिशील सुप्रशासन देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी या पॅनलला निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी श्री. नाईक यांनी केले.
पार्किंगचा प्रश्‍न मिटला पाहिजे. सध्याचे पालिकेतील सत्ताधारी रात्री गुपचूप झाडांची कत्तल करतात, हे योग्य नाही. मिरामार किनार्‍यावरील वाळूचे सपाटीकरण करणे सुरू झाले आहे. पणजीचे भले करणार्‍यांचा उमेदवारांना मते द्या आणि जे विद्ध्वंस करत आहेत अशांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन माथानी साल्ढाना यांनी केले.
महापालिकेने पणजी शहराच्या ह्रदयाला इजा पाहोचवणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी
‘पणजी फर्स्ट’ हे पॅनल निवडून आलेच पाहिजे, असे यावेळी डॉ. रुफीन म्हणाले.
एकूण ३० जागांसाठी निवडणूक होत असून आज (शनिवारी) यातील २५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवार व त्यांचे प्रभाग पुढीलप्रमाणे
प्रभाग १ - नॅटी पो, प्रभाग २ - नेल्सन काब्राल, प्रभाग ३ - ग्लोरीया पो, प्रभाग ४ - प्रभाकर तुकाराम डोंगरीकर, प्रभाग ५ - डॉ. शीतल दत्तप्रसाद नाईक, प्रभाग ६ - अनंत (राजू) शेणवी गायतोंडे, प्रभाग ७ - श्‍वेता राहुल लोटलीकर, प्रभाग ८ - दुर्गा राजेश केळूस्कर, प्रभाग ९ - सुदिन विनायक कामत, प्रभाग १० - माया सतीश जोशी, प्रभाग ११ - मनोज गणपतराव पाटील, प्रभाग १२ - वैदेही विवेक नाईक, प्रभाग १३ - भारती बोरकर (होबळे), प्रभाग १४ - अशोक मोगू नाईक, प्रभाग १५ - शेखर एकनाथ डेगवेकर, प्रभाग १६ - नीना अजय सिलीमखान, प्रभाग १७ - नीलेश रामनाथ खांडेपारकर, प्रभाग १९ - विन्ना दा क्रुझ, प्रभाग २२ - माया रामकृष्ण टाळकर, प्रभाग २३ - शैलेश चंद्रकांत उगाडेकर, प्रभाग २४ - दीक्षा देवानंद माईणकर, प्रभाग २५ - शुभदा (शुभा) प्रभाकर धोंड, प्रभाग २७ - शुभदा गोपाळ चोडणकर, प्रभाग २८ - निवेदिता सुरेश चोपडेकर, प्रभाग २९ - रुपेश रवींद्र हळर्णकर. प्रभाग १८,२०,२१,२६ व ३० साठी उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिक्षणमंत्री व ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वीच पणजी विकास आघाडी नावाने आपल्या समर्थकांचे पॅनल जाहीर केले होते. मात्र, या पॅनलमध्ये घोटाळेबाज व्यक्तींना पुन्हा स्थान दिल्याने धुसफूस सुरू झाली आहे. आपल्या पॅनलमध्ये जागा दिलेल्या काही वादग्रस्त नगरसेवकामुळे बाबूश कोंडीत सापडत असल्याने व मतदारांच्या प्रश्‍नांना तोंड देणे त्यांना शक्य होत नसल्याने बाबूश यांनी आपल्या पॅनलमधून नागेश करीशेट्टी व उदय मडकईकर या दोघांची आतापर्यंत पत्ता कट केला आहे. आता भाजपाचे पॅनल पाहून आणखीही काहींचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पणजीवासीयांप्रति कृतज्ञ - पर्रीकर
ही माझ्या निवडणुकीची धडपड नाही. पणजीवासीयांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. माझ्यावर टीका करणार्‍यांची तोंडे माझे कार्यकर्तेच बंद करतील. या मतदारसंघात बाबूश येऊदे किंवा अन्य कोणी, मी घाबरत नाही, असे गेल्या काही महिन्यांपासून पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर बोलताना श्री. पर्रीकर म्हणाले.

No comments: