Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 February 2011

कॉंग्रेसने देश लुटला

घोटाळ्यांमागे मनमोहनसिंग, सोनिया गांधीच!

संभाजीनगरातील विराट सभेत नितीन गडकरींचा आरोप


संभाजीनगर, दि. ५
बोकाळलेला भ्रष्टाचार, भडकलेली महागाई आणि माफियांचे समांतर सरकार अशा सध्याच्या परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाकडून सारा देश अक्षरश: लुटला जात आहे. २-जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो की, आदर्श घोटाळा असो, या लुटमारीचे खरे आश्रयदाते पंतप्रधान मनमोहनसिंग आणि कॉंगेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधीच आहेत, असा घणाघाती आरोप आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी संभाजीनगरातील विशाल जाहीर सभेत केला.
हजारोंचा जनसमुदाय उसळलेल्या हुडकोतील टी.व्ही. सेंटर मैदानावर आयोजित या जाहीर सभेत व्यासपीठावर भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे, भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी व्यंकय्या नायडू, प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, प्रदेश सरचिटणीस खा. रावसाहेब दानवे, माजी मंत्री हरिभाऊ बागडे (नाना) आदी मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, सामान्यांचे एकवेळ जेवणे महागाईमुळे अवघड झाले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतमालाला भाव नाहीत. त्यातच केवळ लुटारू वृत्तीच्या कृषीमंत्र्यांनी जनावरेही खाणार नाही, असा निकृष्ट गहू विदेशातून आयात केलेला आहे. विदेशातील बँकांमध्ये भारतीयांचे दहा लाख हजार कोटी रुपये अजूनही आहेत. त्यापैकी दशांश ३३ टक्के एवढाच पैसा सरकार भारतात आणू शकलेले आहे. हा विदेशातील सर्व काळा पैसा भारतात आणला तर, प्रत्येक भारतीयाला रोख २ लाख ३४ हजार रुपये मिळू शकतील. सामान्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी दयनीय अवकळा आलेल्या या सध्याच्या काळात सरकारच्या चुकांमुळेच देशभरात दहा लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागात सोळा तासांच्या भारनियमनामुळे पाणी टंचाईचेही संकट आहे.
स्वातंत्र्य मिळून ६३ वर्ष झाली. त्यातील ५५ वर्षे कॉंग्रेसकडे सत्ता होती. कॉंग्रेस नेतृत्व गरीबी हटावच्या गप्पा मारत असले तरी या पंचावन्न वर्षात फक्त कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्तेच श्रीमंत झाले.
सामान्यांची गरीबी होती तशीच आहे. महाराष्ट्रावर तेल, वाळू, दूध, भूमाफियांचे राज्य आहे. त्यातच प्रवेश फी वाढवून शिक्षण माफियाही गब्बर झालेले आहेत. दिवसेंदिवस गरीबांचे जगणे असह्य होत आहे. देशातील नव्वद टक्के लोकांचे उत्पन्न आजही जीवनमान सुसह्य होण्याइतके नाही. महागाई आणि भ्रष्टाचाराच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या गरीबांपुढे जगावं की, मरावं असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून जात, धर्म आणि भाषेचे राजकारण या नेत्यांनी केले. राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे ७० हजार कोटींचा लक्ष्मीदर्शन कारभार होता. भ्रष्टाचाराच्या दुसर्‍या कथेतील १ लाख ७६ कोटी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील अपहार झालेली ही रक्कम खुद्द देशाच्या महानियंत्रक व लेखापालांनी (कॅग) निश्‍चित केलेली आहे. या घोटाळ्यात चौखुर उघळलेले तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजाचा ‘गॉडफादर’ आणि ‘गॉडमदर’ नेमके कोण, त्याची गंगोत्री कोण या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याचा हक्क जनतेला व भाजपालाही आहे. विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याची सरकारची तयारी नाही. दोषींची नावे सांगायला पंतप्रधान तयार नाहीत.
कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा आढावा घेत, यावेळी नितीन गडकरी यांनी ‘बोफोर्स’ घोटाळ्याचेही उदाहरण दिले. या भ्रष्टाचारी राजवटीत कॉंग्रेस सोबत सत्ताधारी आघाडीत सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि अन्य पक्षही तितकेच दोषी आहेत. आता भाजपाने या सगळ्या प्रकारच्या माफियांविरुद्ध संघर्ष सुरू केला आहे. त्याला जनतेचे पाठबळही आहे.
राज्यातील आघाडी सरकारवर प्रखर टीका करताना एकनाथ खडसे म्हणाले की, आदर्श घोटाळ्यात एकटे अशोक चव्हाण दोषी नाहीत. मात्र, लातूरकरांच्या डावपेचांचे ते बळी ठरले. आम्हीही राज्य सरकारचे ३३ घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले आहेत. हे लोक फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन राज्याच्या तिजोरीवर दरोडे टाकताहेत. तेलमाफियांनी यशवंत सोनवणेंसारख्या अधिकार्‍याची हत्या केली. यावरून, त्यांची एवढी मुजोरी कुणाच्या बळावर वाढली हे लक्षात येते. या माफियांना संरक्षण देणारा त्यांचा गॉडफादर पकडला पाहिजे. वाळू माफियांनी तर अक्षरश: हैदोस घातला आहे. मंत्र्यांच्या आश्रयाशिवाय त्यांची मुजोरी वाढणे शक्य नाही. मंत्रालयदेखील झोपडपट्टी म्हणून कागदोपत्री घोषित करणार्‍या या सरकारकडून सामान्यांनी काय अपेक्षा ठेवावी.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावरही महिला व दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. प्रशासनावर सरकारचे नियंत्रण नाही. हे माफियांचे, गुंडांचे राज्य घालविल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनीही कॉंग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र तेल, वाळू, भूखंड माफियांच्या हाती गेला आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचार संपवू असे म्हणत असले तरी, केवळ बोलून भ्रष्टाचार संपत नाही हे त्यांना कळले पाहिजे. आदर्श घोटाळ्याने हा शब्दच बदनाम केला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी सत्ता म्हणजे केवळ आडमाप कमाईचे साधन बनविलेले आहे.
मुख्यमंत्री बदलून दोष जात नाहीत : खा. गोपीनाथ मुंडे
या सभेत भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनीही केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरीत त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले की आदर्श घोटाळ्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलला मात्र, राज्यकर्ते बदलून कॉंग्रेसी भ्रष्टाचारी वृत्तीतील दोष जाणार नाहीत. महागाई वाढल्यामुळे देशाचे कृषिमंत्री लोकांना गहू खाऊ नका, कांदा खाऊ नका असे सांगतात. यंदा कापूस महागल्यामुळे कापडही महागणार आहे, मग हे कृषिमंत्री लोकांना कपडे घालू नका असे सांगतील का? देशातील पुढारलेले राज्य असणार्‍या महाराष्ट्राची दुर्दशा याच राज्यकर्त्यांनी केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना तेल माफियांना जाळले तेव्हा पोलिस कुठे होते? गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याच गावात वाळू माफियांनी तलाठ्याच्या अंगावर ट्रक घातला होता. यावरून विविध माफियांचे सरकारला असलेले आव्हान त्यांनी लक्षात घ्यावे. आदर्श सोसायटीत अजितदादा पवारांनी त्यांच्या संस्थेच्या वसतिगृहाच्या अधीक्षकाला फ्लॅट घेऊन दिला. या अधीक्षकाकडे एवढी खरेदीची ताकद कशी आली? तीस हजार हेक्टरवर उभारलेल्या लवासा प्रकल्पात शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानची व अजितदादा पवार यांच्या आनंद प्रतिष्ठानची जी जागा आहे, ती त्यांनी सरकारला परत करावी, अन्यथा त्यांनाही तुरुंगाची हवा दाखविल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही, अशा इशारा मुंडे यांनी दिला.
भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांनीही केंद्र सरकारचा कारभार ‘पीएम प्रोसीड, मॅडम डिसाईड’ म्हणजे सोनिया गांधी सांगतात आणि पंतप्रधान अंमलबजावणी करतात, असा सारा कारभार सुरू असल्याची टीका केली.

No comments: