खवळलेल्या ग्रामस्थांचा पंचायतीवर मोर्चा, आमदार दिलीप परुळेकरांचा पुढाकार
म्हापसा, दि. ५ (प्रतिनिधी)
रावतावाडा नागवा येथील शेतजमनीत बेकायदा मशिदीचे बांधकाम केल्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी तेथे तोडफोड करून संताप व्यक्त केला. या प्रकरणाची तक्रार नागवा पंचायतीत व हणजूण पोलिसात नोंद केली असल्याची माहिती मिळताच साळगावचे आमदार दिलीप परुळेकर व जिल्हा पंचायत सदस्य मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली रावतावाडा आणि साळगाव मतदारसंघातील सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थांनी नागवा पंचायतीवर धडक मोर्चा नेऊन सरपंच व सचिव यांना घेराव घातला.
दि. ३ रोजी नागवा पंचायतीतर्फे रावतावाडा येथील शेतात चाललेल्या बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेले सरपंच आणि सचिव यांच्या डोळ्यांसमोर येथील फार्म हाऊसची तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड केल्यानंतर दि. ४ रोजी बांधकाम मालक फासखी अली जाफर यांच्यासमवेत एका स्थानिकाने नागवा पंचायत व हणजूण पोलिस स्थानकात तक्रार नोंदवल्याची माहिती मिळाली.
सरपंच व सचिव यांच्या मते जर सदर बांधकाम बेकायदा आहे मग पंचायतीने याकामी त्वरित पावले का उचलली नाहीत, असा प्रश्न पंचायत आणि सचिव कृष्णकांत गोवेकर व सरपंच आग्नेलो डिसोझा यांना याप्रसंगी करण्यात आला. तसेच काहीही झाले तरी रावतावाड्यातील शेतात बांधकाम होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार तेथे जमलेल्या चारशेहून अधिक नागरिकांनी केला. याच ठिकाणी आमदार परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मैदान उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात आवश्यक ठराव संमत करून गटविकास अधिकारी व नगर नियोजन पदाधिकार्यांस कळवण्यात येते व त्यानंतर १५ दिवसांच्या आत बांधकाम पाडण्यात येते, असे सचिवांनी सांगितले. मात्र खवळलेले ग्रामस्थ त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे जमावाचा एकूण रागरंग पाहून पंचायत संचालकांना अहवाल पाठवतो असे पंचायत सचिवांनी सांगितले.
दि.३ फेब्रुवारी रोजी सरपंच व सचिवांनी जागेची पाहणी करताना या बांधकामासंबंधी निर्णय घेऊन बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी आज पंचायतीवर मोर्चा आणला होता. ग्रामस्थांनी सरपंच व सचिवांना घेराव घातला.
सदर बांधकामाबद्दल नेमकी कोणती कृती करणार, असा खडा सवाल आमदार दिलीप परूळेकर यांनी विचारला.
पंचायतीवर स्थानिकांनी मोर्चा आणल्याची माहिती मिळताच निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Sunday, 6 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment