-सीबीआयचा खळबळजनक अहवाल
नवी दिल्ली, द. ११ : २-जी स्पेक्ट्रम परवान्यांचे वाटप करताना झालेल्या घोटाळ्यात देशाच्या तिजोरीला १.७६ लाख कोटी रुपयांचा भुर्दंड बसला असला तरी, या घोटाळ्याचे सूत्रधार माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी मात्र या घोटाळ्यात चक्क तीन हजार कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे वृत्त मीडियाने सीबीआयच्या हवाल्याने दिले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का देणार्या या घोटाळ्याचा तपास सध्या सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) संयुक्तपणे करण्यात येत आहे. या दोन्ही तपास संस्थांनी केलेल्या संयुक्त चौकशीतून असे स्पष्ट झाले की, ए. राजा यांनी स्पेक्ट्रम परवान्यांचे आपल्या मर्जीतील दूरसंचार कंपन्यांना अतिशय स्वस्त दरात वाटप केले आणि या सर्व कंपन्यांकडून त्यांनी मोठ्या प्रमाणात दलाली स्वीकारली. त्यांनी स्वीकारलेली दलाली तीन हजार कोटींच्या घरात आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या मंगळवारी आपल्या चौकशीचा प्रगती अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. या अहवालात ही धक्कादायक माहिती समाविष्ट आहे.
सीबीआय आणि ईडीच्या अहवालाचा हवाला देत एका मोठ्या दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. राजा यांनी स्पेक्ट्रम वाटपाचे अर्ज सादर करण्यासाठी आधी ठरवून दिलेली तारीख एक आठवड्याने कमी केली आणि अतिशय स्वस्त दरात परवान्यांचे वाटप केले. आधी अर्ज सादर करण्यासाठी सरकारने १ ऑक्टोबर २००७ ही तारीख निश्चित केली होती. पण, राजा यांनी आपल्या अधिकारात ही तारीख एक आठवड्याने कमी करून ती २५ सप्टेंबर केली, असे या अहवालात म्हटले आहे. राजा यांनी या प्रक्रियेत अमाप संपत्ती कमवताना देशाच्या तिजोरीला मात्र प्रचंड नुकसान केले आहे.
Saturday, 12 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment