पणजी महापालिका निवडणूक
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेवर गेली पाच वर्षे सत्ता गाजवणारे सत्ताधारी मंडळ हे कुचकामी ठरले आहे. पणजीच्या लोकांच्या दैनंदिन गरजासुद्धा या मंडळाला पुर्या करता आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यमान मंडळाचे गेल्या पाच वर्षातील अपयशच ‘पणजी फर्स्ट’ला सत्ता मिळवून देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. आज (दि. ८) पणजीत एका विकासकामाची सुरुवात करण्यास श्री. पर्रीकर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना ’पणजी फर्स्ट’ या पॅनलबाबत व पणजी महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी मंडळाबाबत विचारले. त्यावेळी श्री. पर्रीकर यांनी वरील निवेदन केले.
यावेळी पुढेे बोलताना श्री. पर्रीकर म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पणजीतील गटारे उपसलेली नाहीत. सत्ताधारी फक्त घोटाळेच करण्यात मग्न आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पणजीकरांना नवे मंडळ मिळेल असा ठाम विश्वास श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केला.
‘पणजी फर्स्ट’ पणजीकरांचे पॅनल
पत्रकारांनी श्री. पर्रीकर यांना पणजी फर्स्ट भाजपचेच पॅनल आहे का? असा प्रश्न केला असता श्री. पर्रीकर म्हणाले की या पॅनलला भाजपचे समर्थन आहे. त्यातील बरेच कार्यकर्ते भाजपचे आहेत. तरीसुद्धा पणजी फर्स्ट पूर्णपणे भाजपचे पॅनल नसून ते समस्त पणजीकरांचे पॅनल आहे. पत्रकारांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन वृत्त प्रसिद्ध करावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
देशप्रभूंनी पुरावे पोलिसांना द्यावेत
श्री. पर्रीकर यांना राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांनी काल दि. ७ रोजी ’भाजपचे आमदार ड्रग्ज व्यावसायिकांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहतात. म्हणून ते सुद्धा ड्रग्ज व्यवहारात आहेत’ असा आरोप केला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आरोप कुणीही कसलेही करू शकतो. असे सांगून श्री. देशप्रभू हे वाचाळवीर आहेत. जर त्यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत असे आव्हान दिले. देशप्रभू उगाच काहीतरी बरळतात व प्रसिद्धीमाध्यमे ते वृत्त देतात हे योग्य नसून वृत्ताची शहानिशा करून वृत्त द्यावे असे सांगितले. गुहमंत्री स्वतः सुद्धा असेच बरळत होते व पुरावे द्या म्हणताच गप्प झाले. एखाद्या व्यक्तीचा सत्कार संस्था आयोजित करते तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून जाणार्याने आयोजकाकडे प्रत्येक उपस्थिताचे ‘कॅरॅक्टर सर्टिफिकेट‘ मागावे का? असा सवाल श्री. पर्रीकर यांनी यावेळी केला.
बॉक्स करणे मतमोजणीच्या निर्णयाबाबत विश्वासात घेतले नाही
पणजी महापालिका निवडणुकीनंतर त्याच दिवशी मतमोजणी करण्याचा निर्णय घेताना विरोधी गटाला किंवा स्थानिक आमदाराला विश्वासात घेतले नसल्याचे आज पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.
हा निर्णय चांगला असला तरी, त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कारण या निवडणुकीत उतरलेला दुसरा गट हा पोलिस स्थानकावर हल्ला, आयटी हॅबिटाट, जाळपोळ आणि युथ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या प्रकारात गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रक्रियेवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या निर्णयावर अधिसूचना निघेल त्यावेळी आपण योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुद्दासीर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबद्दल श्री. पर्रीकर यांना विचारले असता त्यांनी वरील मतप्रदर्शन केले.
Wednesday, 9 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment