डी. डी. कोसंबी विचार महोत्सव
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): धार्मिक सलोख्याशिवाय जगात शांतता प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे. गीतेत सांगितलेल्या ज्ञान, भक्ती, कर्म व राजयोगांच्या साहाय्याने प्रत्येकाने आपले अंतरंग प्रकाशमान करावे व प्रत्यक्ष आत्म्याशी एकरूप व्हावे. हे प्राप्त करण्यासाठी योगमार्गाची शिकवण दिली आहे. वेदांतात सांगितल्याप्रमाणे जगात ‘वसुदेव कुटुंबकम्’ अवतारायचे असेल तर आत्मशुद्धीकरण महत्त्वाचे आहे. सध्याच्या हिंसा, वाद व द्वेषयुक्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेदांत व उपनिषदांतील शिकवणीचा अवलंब करून आपल्या शिक्षणातूनच मानवी मूल्यांचा प्रसार करावा. वैचारिक किंवा धार्मिक असो मूलतत्त्ववाद हा विनाशालाच आमंत्रण देणारा ठरेल, असे प्रतिपादन डॉ. करण सिंग यांनी केले.
डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात शेवटचे पुष्प गुंफताना ‘सद्यःस्थितीत वेदांतचे महत्त्व’ या विषयावर बोलताना डॉ. करण सिंग यांनी आज (दि.१०) यावर भाष्य केले. आधुनिक युगात वेदान्ताचे महत्त्व अधिकाधिक वाढत चालले आहे. गुरू-शिष्य परंपरेतील संवादात्मक पद्धतीतून प्रत्येक गोष्टीचा उलगडा करणे सहज साध्य आहे. आपल्या सर्वांच्या अंतरंगात एक दैविक शक्ती वास करते व ती जागृत केल्यास खर्या अर्थाने जगात मानवी मूल्यांचे जतन होणे शक्य आहे, असेही डॉ. करण सिंग म्हणाले. आपले जीवन हा एक आध्यात्मिक प्रवास आहे. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे व त्यातील प्रत्येक व्यक्ती ही सुखी असावी हे तत्त्वज्ञान आपल्याला उपनिषदांतून देण्यात आले आहे. जोपर्यंत सर्व धर्मांत सलोखा रुजणार नाही तोपर्यंत शांतता व बंधुभाव रुजणार नाही. प्रत्येक धर्म शांतता व बंधुभावाची शिकवण देतो व त्यामुळेच प्रत्येक धर्मातील चांगले तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. भारतीय संविधानात मूलभूत हक्कांसाठी प्रत्येकजण लढत असतो पण त्याचबरोबर संविधानातील मूलभूत कर्तव्यांचा मात्र आपल्याला विसर पडला आहे. समाजाप्रति आपली काहीतरी जबाबदारी असते याचे भान प्रत्येकाने ठेवायलाच हवे, असेही ते म्हणाले. आपली संस्कृती व परंपरेचा आदर राखा तरच आपण पुढे जाऊ, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
भारताने निधर्मवाद स्वीकारल्याने त्याचा परिणाम म्हणूनच की काय आपण धार्मिक मूल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहोत. केवळ हिंदू धर्मातील मूल्यांचा पुरस्कार करण हेे निधर्मवादाचा फाटा ठरत असेल तर प्रत्येक धर्मांतील मूल्यांचा मिलाप करून त्याचा समावेश शिक्षण पद्धतीत करणे उचित ठरेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ हा मंत्र जपणे गरजेचे आहे. आपल्या सभोवती समाजातील दुःख, वेदना, करुणा याचे निरसन करण्यासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तर समाज सुखी होण्यास अजिबात वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. करण सिंग यांनी उपस्थित प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही समर्पक उत्तरे दिली. धर्माच्या नावाने कर्मकांडांचा अतिरेक होता कामा नये, असे सांगतानाच विवाह सोहळ्यांवरील अमाप खर्चावरही त्यांनी नाराजी व्यक्त करून त्याऐवजी गरिबांना मदत केल्यास ते अधिक चांगले ठरेल, असेही ते म्हणाले. गोव्यातील युवकांनी मद्य, तंबाखू किंवा अन्य वाईट गोष्टींपासून अलिप्त राहावे, असे आवाहनही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केले. सुरुवातीला पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते डॉ. सिंग यांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. सभापती प्रतापसिंग राणे यांनी डॉ. सिंग यांना राधेश्यामाची मूर्ती प्रदान करून त्यांचा गौरव केला. सूत्रसंचालन सुबोध केरकर यांनी केले.
Friday, 11 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment