वस्तू वाटप प्रकरणांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याची अनेक प्रकरणे बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलच्या विरोधात दाखल झाल्याने त्याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असून सबळ पुरावे आढळल्यास या पॅनलच्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी दिले.
पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने काही उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. काही वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांवरून तर प्रत्यक्षात मतदारांना विविध वस्तूंचे वाटप होत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. मुदास्सीर यांनी दिली. काही प्रभागांत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू असल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. ही निवडणूक खुल्या व मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग पूर्णपणे दक्ष असून त्यासाठी निवडणूक निरीक्षकांना व्हीडीओग्राफरांचीही सोय करून देण्यात आल्याचे ते म्हणाले. मंत्री किंवा आमदार यांच्याकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा बोलावणे किंवा प्रचारास उघडपणे फिरणे आचारसंहितेचा भंग ठरतो व त्याचीही दखल आयोगाने घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेसाठी यावेळी मतदानकेंद्रे दुपटीने वाढवली आहेत व या निवडणुकीसाठी मतदानयंत्रांचा वापर होणार असल्याने १३ रोजी मतदानानंतर मतमोजणी घेणे सहज शक्य होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हातच्या कंकणाला आरसा कशाला ः पर्रीकर
‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’, अशी प्रतिक्रिया नोंदवत बाबूश मोन्सेरात यांच्याकडून आपल्या उमेदवारांच्या प्रचारावेळी मतदारांना राजरोसपणे वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे वृत्त फोटोसहित प्रसिद्ध झाल्याने राज्य निवडणूक आयोगाला वेगळे पुरावे कशाला हवेत, असा सवाल विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच तक्रार नोंदवली आहे. मुळात हे प्रकार घडत असताना आयोगाने पोलिस व निरीक्षकांकरवी तात्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील एक संशयित सध्या काही प्रभागांतील लोकांना धमक्या देत फिरतो आहे. मतदारांवर दबाव आणून त्यांच्यावर ठरावीक उमेदवारांनाच मतदान करण्याची सक्ती करण्यात येत असून हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असेही यावेळी पर्रीकर म्हणाले. ‘मनी अँड मसल पॉवर’चा वापर करून मतदारांवर दबाव घालण्याचा हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना निवडणूक आयोग नेमके काय करतो आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.
‘पॅन्जीमाईट्स’तर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे व त्यात बाबूश समर्थक एकाही उमेदवाराचा समावेश नाही, यावरून जनतेने आता विचार करण्याची गरज आहे. बाबूश समर्थक गटांत काही चांगले लोक असण्याची शक्यता आहे; पण त्यांनी आपले शहाणपण गहाण ठेवल्याने त्यांना वैयक्तिकरीत्या स्वीकारणे जनतेला परवडणारे नाही, असा टोलाही पर्रीकर यांनी लगावला. लोकप्रतिनिधींना आपल्या उमेदवारांच्या प्रचारात भाग घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही; केवळ सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होता कामा नये व त्याकडेच आयोगाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही पर्रीकर शेवटी म्हणाले.
Thursday, 3 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment