वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): गेल्या २४ तासांत मुरगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघे सायकलस्वार ठार झाले. आज सकाळी वेर्णा औद्योगिक वसाहतीत सायकलवरून जात असताना मागून ‘पावलू ट्रॅव्हल्स’च्या बसने नुवे येथील रेमेडीयस रॉड्रिगीस (४७) याला धडक देऊन त्यास फरफटत नेल्याने तो ठार झाला तर काल रात्री दाबोळी महामार्गावर सायकल घेऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना समोरून दुचाकीने धडक दिल्याने बोगदा येथील रामबहादूर दांगी (५२) यास आज सकाळी उपचार घेत असता मरण आले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नुवे येथील रेमेडीयस रॉड्रिगीस आपल्या सायकलवरून वेर्णा औद्योगिक वसाहतीत जात असताना याच बाजूने मागून येणार्या ‘पावलू ट्रॅव्हल्स’च्या बसने (क्र. एमएच ०७ सी ७८७८) त्यास जबर धडक दिली व काही अंतरावर फरफटत नेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. उपचारार्थ त्यांना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेत असतानाच त्यांना मृत्यू आला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालक नरेश कुडास्कर (वय ३३, महाराष्ट्र) याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली व नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान, काल संध्याकाळी ७.४० च्या सुमारास बोगदा येथील रामबहादूर दांगी हा इसम सायकलवरून दाबोळी येथील महामार्ग ओलांडत असताना समोरून येणार्या दुचाकीने त्याला जबर धडक दिली व त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल केले असता आज पहाटे त्याचे तिथे निधन झाले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार, बिर्ला येथील सिथसेन विश्वकर्मा या २३ वर्षीय युवकाच्या दुचाकीची दांगी याला धडक बसली. शवचिकित्सेनंतर पोलिसांनी दांगी याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला असून ते पुढील तपास करत आहेत.
Saturday, 5 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment