पणजी, दि. २७ (शैलेश तिवरेकर): जीवन म्हणजे एक नाटकच आहे. आम्ही माणसे म्हणजे या नाटकातील कलाकार असून त्याचा निर्माता दिग्दर्शक साक्षात परमेश्वर आहे. प्रत्येक माणसाच्या वाट्याला जो अभिनय येईल तो त्याने व्यवस्थित पार पाडून रंगमंच सोडावा ही तर जीवनाची रीतच आहे. या रंगमंचावरील प्रत्येकाचे अनुभव मात्र वेगवेगळे असतात. काहींच्या नशिबात पावलागणिक सुख तर काहींच्या नशिबात दुःखाचे डोंगर असतात. परंतु हिमतीने आणि चिकाटीने काम करून उशिरा का असेना परंतु या दुःखाच्या डोंगरातून सोईस्करपणे आर्थिक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुखाचा मार्ग शोधणारी अनेक माणसे आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘राजबी’.
विवाह झाल्यापासून त्यांच्या पाचवीला केवळ दुःखच पुजलेले आहे. परंतु त्यांनी कधीही जीवनाच्या या नाटकात हार मानली नाही. जे काही समोर येईल त्याला खंबीरपणे सामोरे जाणे आणि आपले नसले तरी आपल्या मुलांचे चांगले भविष्य घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले आणि आज २५ वर्षानंतर ज्या गोष्टीची त्या वाट पाहत होत्या त्या त्या गोष्टी त्यांच्या पायाशी लोळत आहेत. आज राजबींचा स्वतःचा फ्लॅट आहे. दोन मुलगे आणि एक कन्या अशी त्यांना अपत्ये असून कन्येला त्यांनी आपल्या परिवारातील योग्य असा नवरा मुलगा पाहून योग्यरितीने विवाह करून कन्येला सासरी पाठवण्यात आले आहे. तर मोठ्या मुलाचे लग्न करून आपल्या नातवंडासहित त्या मजेत वेळ काढत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींसोबतच राजबींनी आपल्या व्यवसायात अजूनही काहीच कमी केलेले नसून उलट दिवसेंदिवस त्याचा विस्तार वाढवत आहेत.
मूळ बेळगाव येथील असलेल्या ‘राजबी’ आपली जीवन कथा सांगताना त्यांचा ऊर अगदी भरून यायचा. परंतु सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा असा त्यांचा हा जीवनपट आहे पण आजही त्यांना त्याचा कोणताच अभिमान वा गर्व नाही. उलट त्या म्हणतात. जे आपल्या वाट्याला आले त्याचा आपण आनंदाने स्वीकार केला. त्याचे यश आज आपल्या पदरी पडले आहे. त्याचाही आपण आनंदाने स्वीकार करत आहे.
जीवन हे असेच आहे, जे आहे ते चांगले आहे म्हणून स्वीकारावे यालाच जीवन म्हणतात. शून्यातून विश्व निर्माण करणार्या राजबी अगदी निर्विवाद आणि मोकळेपणाने बोलत होत्या. पतीच्या आणि सासुरवाडीच्या छळणुकीला आणि पतीच्या माराला कंटाळून स्वतःकडचे घड्याळ केवळ ५० रुपयाला गहाण ठेवून अवघे ५० रुपये आणि सोबत तीन चिमुकल्या मुलांना घेऊन राजबी गोव्यात आल्या. सुरुवातीला त्यांनी मडगाव येथे काय मिळेल ते काम केले. त्यानंतर देवगड सावंतवाडी या भागात गटार खोदण्याचे काम करून मिळेल त्या आसर्याला राहत होत्या. काही काळा नंतर त्या पुन्हा गोव्यात आल्या. सोबत मुले होतीच. त्यांच्यासाठीच तर त्या जिवाचे रान करत जगत होत्या. गोव्यात आल्यावर त्यांनी बाबा टाइल्स कंपनीत काम करून एका झोपडीत आपल्या मुलांचे संगोपन करू लागल्या. बाबा टाइल्स कंपनीत काम करतानाच काहीतरी जास्त काम करून जास्त कमावणे आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होऊ लागली. कारण आता मुले मोठी होत होती आणि त्यांच्या गरजाही वाढत होत्या. म्हणूनच त्यांनी पर्वरी भागात छोट्या प्रमाणात भाजीची टोपली घेऊन घरोघरी फिरणे सुरू केले. सकाळी म्हापसा बाजारातून भाजी आणून ती विकणे आणि नंतर कामावर जाणे असा त्यांचा नित्यक्रम ठरला होता. नंतर त्यांच्या लक्षात आले की भाजीविक्रीच्या व्यवसायात चांगला जम बसत आहे. म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. गोड वाणी आणि व्यवसायातील सत्यता, चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला. नंतर टोपली घेऊन फिरणे शक्य होत नसल्याने त्या रिक्षा चालवायला शिकल्या आणि कंपनीतून मिळालेला भविष्य निर्वाहनिधी व भाजी व्यवसायातील पैशांतून वापरलेली रिक्षा विकत घेतली व रिक्षेतून दारोदारी फिरून भाजी विकणे सुरू केले. आज या भाजी विक्री व्यवसायाच्या जोरावर त्यांच्या सार्या कुटुंबाचा चांगलाच जम बसला असून शून्यातून स्वबळावर निर्माण केलेल्या विश्वात त्या अगदी सुखात आहे. आज त्यांच्याकडून रोज भाजी खरेदी करणारे त्यांचे ग्राहकही त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत राहतात. याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या ग्राहकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास होय. म्हणूनच कुठल्याही व्यवसायात चिकाटी आणि ग्राहकाचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे.
Monday, 28 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment