मडगावातील शिक्षण संस्थेतील प्रकार
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी): येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या इमारतीतील सुरक्षा रक्षकाचा खून करून चोरट्यांनी रोख दहा हजार व एक लॅपटॉप पळविला व त्यामुळे शहरात आज एकच खळबळ माजली. इतके दिवस भरदिवसा घरे फोडून चोर्या होत होत्या; पण आता सुरक्षा रक्षकाचा खून करून चोर्या करण्याइतपत चोरट्यांची मजल गेल्याने कायदा व सुव्यवस्था साफ कोलमडलेल्या या राज्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही सुरक्षित राहिलेला नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
पेडा येथील सदर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय असलेल्या ठिकाणी हा प्रकार पहाटे २ ते ३.३०च्या दरम्यान घडला. चोरट्यांनी गणपत जोशी या नेपाळी सुरक्षा रक्षकावर दंडुक्याने हल्ला केला व त्याच्या वर्मावरच प्रहार झाल्याने त्यात तो जागीच ठार झाला. शाळेशेजारी राहणार्यांना चोरांशी गुरख्याचा चाललेला वाद ऐकून जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता चोर पसार झाले होते व रक्षकाचा पत्ता नव्हता. नंतर त्यांनी शाळेच्या आवारात त्याचा शोध घेतला असता तो इमारतीच्या दुसर्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. लगेच हॉस्पिसियोत नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या कयासानुसार रक्षकाच्या नकळत चोरटे इमारतीत घुसले असावेत व त्यांनी तळमजल्यावरील व्यवस्थापकांची कचेरी फोडली व तेथील कपाटे व टेबलाचे खण तोडले. त्यानंतर त्यांनी शेजारची मुख्याध्यापकांची कचेरी फोडून कपाटातील रोख १० हजार पळविले. पुस्तके, महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून नंतर ते पहिल्या मजल्यावरील प्राचार्यांच्या कचेरीत कुलूप तोडून शिरले व तेथे त्यांनी दोन कपाटे फोडली, टेबलाचे खण तोडले व प्राचार्याचा लॅपटॉप घेऊन ते पळाले. कदाचित त्यावेळी दुसर्या मजल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांची चाहूल लागून तो त्यांना पकडण्यासाठी गेला असता त्यांच्यात भांडण झाले व चोरांनी स्टूल वा लाकडी दंडुक्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला व त्यात तो मरण पावला असावा.
शेजार्यांनी पोलिसांना माहिती देताच निरीक्षक संतोष देसाई घटनास्थळी आले व त्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. एकंदर प्रकारावरून चोर एकटा नसून तीन किंवा चार जण असावेत असा अंदाज आहे. पोलिसांनी सकाळी श्वानपथक आणून तपासणी केली व ठसेही घेतले. नंतर त्या ठिकाणी दोन मनगटी घड्याळे मिळाली. त्यातील एक सुरक्षा रक्षकाचे तर दुसरे हल्लेखोरांपैकी एकाचे असावे. त्यांनी प्राचार्यांचा नेलेला लॅपटॉप नंतर इमारतीतच अडगळीच्या जागी सापडला. अधिक तपास चालू आहे.
Saturday, 5 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment