ट्रकांच्या हौदाची पट्टी जाणार
अखेर ट्रकमालकांना अटी मान्य - १०.५ टनच खनिज भरणार
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): ट्रकांच्या मागील हौदाला बसवण्यात येणारी लाकडी पट्टी काढण्याचे आणि १०.५ टनापेक्षा जास्त खनिज माल ट्रकात न भरण्याचे दक्षिण गोवा खनिज ट्रक वाहतूक कृती समितीने मान्य केले असल्याची माहिती आज वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली. वाहतूक खात्याने सुरू केलेली कारवाई थांबवण्यासाठी संपूर्ण गोव्यातील वाहतूक बंद करण्याची धमकी दिल्यानंतर आज खास बोलावण्यात आलेल्या बैठकीत ट्रक मालकांनी या अटी मान्य केल्याचे ते म्हणाले.
या बैठकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक, संचालक अरुण देसाई, कायदा सचिव, खाण सचिव व कृती समितीचे सुभाष फळदेसाई आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
वाहतूक खाते न्यायालयाने दिलेल्या आदेशाचेच पालन करते आहे. या आदेशाचे पालन करणे सरकाराला तसेच ट्रक वाहतूक करणार्यांनाही बंधनकारक असल्याचे यावेळी ऍड. कंटक यांनी त्यांना सांगितले. तसेच, याचे पालन न झाल्यास न्यायालयाकडून कारवाई होऊ शकते, याकडेही ट्रकमालकांचे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे शेवटी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे या ट्रक मालकांनी मान्य केले असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
अतिरिक्त खनिज नेण्यासाठी अनेक ट्रक मालकांनी ट्रकाच्या हौदाला ९ सेंमी.ची लाकडी पट्टी बसवली आहे. ही पट्टीवरून गेल्या काही दिवसांपासून वाहतूक खात्याने जोरदार कारवाई सुरू केली होती. केवळ सतावणूक करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा दावा करून ट्रकमालकांनी गुरुवारी कुडचडे येथे मुख्यमंत्र्यांना घेरावही घातला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन या आंदोलनकर्त्यांना दिले होते.
Saturday, 5 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment