Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 1 March 2011

कारवाई त्वरित थांबवा

खनिज ट्रकमालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन वाहतूक खात्याने गोव्यातील खनिज ट्रक मालकांची जी सतावणूक चालवली आहे ती त्वरित बंद करावी, अशा आशयाची मागणी आज २८ रोजी कुडचडे - केपे, सावर्डे परिसरातील खनिज ट्रकमालकांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना केली. दक्षिण गोवा खनिज ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई व सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट पर्वरी मंत्रालयात घेतली.यावेळी या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती श्री. फळदेसाई यांनी दिली.
बेदरकार व नियमांचे खुलेआम उल्लंघन करणार्‍या खनिज वाहतुकीविरोधात वाहतूक खात्याने जोरदार कारवाईची मोहीम उघडल्याने सावर्डे, कुडचडे व केपे भागातील सुमारे १५० ट्रकमालकांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक दिली. मुख्यमंत्री कामत हे बंगल्यावर हजर नसल्याने अखेर त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता या ट्रकमालकांच्या शिष्टमंडळाला पर्वरी मंत्रालयात बोलावण्यात आले.
वाहतूक खात्याने खनिज ट्रकांना मागील बाजूच्या फळ्या काढण्याची सक्ती केली आहे व अशा फळ्या असलेल्या ट्रकांना दंड ठोठावला जात आहे. या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, वाहतुकीचा वेळ पूर्ण दिवस सकाळी ८ ते संध्या. ६ असाच असावा व खनिज वाहतुकीसाठी वेगळ्या बगलमार्गांची उभारणी व्हावी, अशा मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. दरम्यान, खनिज वाहतुकीमुळे उद्भवणार्‍या समस्यांचे कारण पुढे करून सरकार केवळ ट्रकमालकांना वेठीस धरीत आहेत. मुळात सरकारने ट्रक नोंदणी करून घेतले ते काय मालकांनी शोभेसाठी दारांत उभे करून ठेवावे असे सरकारला वाटते काय, असाही सवाल यावेळी करण्यात आला. मुळात ही परिस्थिती ओढवण्यास सरकारच जबाबदार आहे. रस्ते रुंद करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना रोजगार देण्यास सरकारला शक्य होत नाही व खनिज वाहतुकीच्या वाढत्या मागणीमुळे कर्ज काढून ट्रक घेतलेल्यांना व्यवसाय करण्यासही सरकार देत नाही. असे असताना सामान्य लोकांनी जगायचे कसे, असाही सवाल यावेळी काही ट्रकमालकांनी पत्रकारांशी बोलताना केला. ट्रकमालकांच्या तांत्रिक अडचणींचाही सहानुभूतीपूर्वक विचार होण्याची गरज आहे. या सर्व प्रकाराला केवळ खनिज ट्रक वाहतूकदारच कारणीभूत असल्याचा जो आभास निर्माण केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. या एकूण प्रकरणाला सरकारही तेवढेच जबाबदार असून याचा साधकबाधक विचार करूनच त्यातून योग्य तो मार्ग काढावा लागेल, असेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कारवाई करायला फक्त खनिज वाहतूकदारच दिसतात काय? राज्यात मटका, जुगार तसेच इतर अनेक बेकायदा व्यवहार चालतात त्यांच्यावर अशी व्यापक कारवाई का केली जात नाही, असाही सवाल यावेळी काही ट्रकमालक करीत होते.
वाहतूक खात्याची कारवाई कायद्यानुसारच : अरुण देसाई
वाहतूक खात्याची कारवाई कुणाच्या सतावणुकीसाठी अजिबात नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली. खनिज ट्रक व्यावसायिकांनी न्यायालयाच्या आदेशांचा सन्मान करावा व वाहतूक खात्याला खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दक्षिण गोवा ट्रक व्यवसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली असता त्यांनाही हीच गोष्ट समजावून सांगितल्याचे श्री. देसाई म्हणाले.
------------------------------------------------------
कॉंग्रेसी ‘चमच्यां’ची घुसखोरी
दरम्यान, आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी बंगल्यावर धडक दिलेल्या ट्रकमालकांच्या गर्दीत काही कॉंग्रेसी ‘चमच्यां’नी घुसखोरी करून उपस्थित ट्रकमालकांना भाजप विरोधात चिथावण्याचे काम चालवल्याचे आढळून आले. वाहतूक खात्याच्या या कारवाईला ‘पीएसी’ समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असा उघड प्रचार हे लोक करताना दिसत होते. मनोहर पर्रीकरांनी खनिज वाहतुकीवरून संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरल्यानेच ही कारवाई करणे सरकारला भाग पडले, असेही हे लोक उपस्थितांना सांगत होते. या गटातील हे लोक या प्रकरणी काही कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केल्याचा दावा करून या कारवाईत सरकारला काहीही रस नाही तर केवळ पर्रीकरांनी ‘पीएसी’ व्दारे ही कारवाई करण्याचा तगादा लावल्यानेच सरकारचा नाइलाज झाल्याचे सांगून उपस्थित ट्रकवाल्यांचे कान फुंकण्याचे काम जोरात करताना दिसत होते.

No comments: