भाजपच्या पुस्तिकेचे उद्या होणार प्रकाशन
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार असंख्य घोटाळ्यांनी बरबटलेले आहे. या सरकारच्या घोटाळ्यांची जंत्रीच ‘कलंकित सरकार’ या माहिती पुस्तिकेच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. येत्या ४ रोजी पणजीत गोमंतक मराठा समाज सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे लोकसभेचे उपनेते तथा गोव्याचे राष्ट्रीय निवडणूक प्रभारी गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होईल, अशी घोषणा आज गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली.
आज भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रा. पार्सेकर यांच्यासोबत केशव प्रभू व कुंदा चोडणकर उपस्थित होत्या. गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपतर्फे सरकारला शेकडो प्रश्न विचारण्यात आले होते. अधिवेशनाचा कार्यकाळ अत्यंत कमी होता व त्यामुळे हे सर्वच प्रश्न चर्चेसाठी येऊ शकले नाहीत. विधानसभा कामकाजाच्या थेट प्रक्षेपणातही अनेकांनी विघ्ने आणून विविध ठिकाणी केबल तोडण्याचे प्रकार केले व त्यामुळे जनतेला हे थेट कामकाज पाहता आले नाही. भाजपकडून विचारण्यात आलेल्या असंख्य प्रश्नांवर सरकारने दिलेल्या माहितीत विविध घोटाळ्यांचा पर्दाफाशच झाला आहे. ‘कलंकित सरकार’ या माहिती पुस्तिकेत सरकारच्या या कुकर्मांची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोचवण्यात येईल, असे प्रा. पार्सेकर म्हणाले.
मराठी व इंग्रजी भाषेत मिळून या पुस्तिकेच्या एक लाख प्रती छापण्यात आलेल्या आहेत. पणजीतील मेळाव्यात या पुस्तिका सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सोपवण्यात येणार असून त्यामुळे सरकारच्या विविध भानगडी चव्हाट्यावर येणार आहेत, असेही ते म्हणाले.
ड्रग्ज प्रकरण, अबकारी घोटाळा, सा. बां. खात्यातील दलाली, केरोसीनचा काळाबाजार, कॅसिनो, बेकायदा खाण, धूळ प्रदूषण, आरोग्य खात्याचे ‘पीपीपी’करण, कचरा समस्या, हायक्वीप कंत्राट घोटाळा, पाण्याच्या टाक्यांचे प्रकरण आदी एकापेक्षा एक असंख्य घोटाळ्यांची विस्तृत माहितीच या पुस्तिकेत दिली आहे. गोव्यातील १८९ पंचायती, १४ पालिका व एक महापालिका अशा सर्व ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्यांची या पुस्तिका वितरणासाठी निवड करण्यात आली आहे. ५ ते २० मार्च या दरम्यान, ही पुस्तिका प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचेल. या पुस्तिकेतील माहिती ही सरकारकडूनच मिळाल्याने त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपवर राहील, अशी हमीही प्रा. पार्सेकर यांनी दिली. यापुढे भाजपतर्फे या सरकारचा उल्लेख ‘कलंकित सरकार’ असाच केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Friday, 4 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment