विरोधकांचा जोरदार आरोप
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मतदारांना विविध वस्तूंचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे. विविध भागांत फ्रीज, टीव्ही, ‘एलसीडी’ मोबाईल तसेच सायकलींचे वितरण जोरात सुरू आहे. काही लोकांच्या घरांचे दुरुस्ती कामही सुरू करण्यात आले असून भाटले तसेच इतर काही भागांतील लोकवस्तीत असलेले भले मोठे वृक्षही कापून साफ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पणजी महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी सध्या बराच जोर लावला आहे. आपल्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते घरोघरी भेटी देत आहेत. या भेटीत अनेकांना विविध वस्तूंचे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांचे विरोधक करीत आहेत. विविध भागांत शालेय मुलांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे तसेच विविध वस्तूंचेही निर्धास्तपणे वाटप सुरू असून निवडणूक यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान, घराशेजारील धोकादायक वृक्ष कापण्यासाठी सामान्य लोकांना सरकारी खात्यांत खेपा माराव्या लागण्याचे अनेक प्रकार ताजे असताना महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाटले तथा इतर भागांतील भलेमोठे वृक्ष कापण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हे वृक्ष वन खात्याची परवानगी न घेताच कापण्यात आले असले तरी त्याचे काहीही सोयरसुतक वन खात्यालाही पडून गेलेले नाही. बाबूश यांच्याकडून सरकारी यंत्रणेचाच गैरवापर होतो आहे, अशी टीकाही त्यांच्यावर केली जात आहे.
गेली पाच वर्षे पणजी महापालिकेवर बाबूश समर्थक गटाचीच सत्ता असताना सामान्य जनतेच्या समस्यांची आठवण त्यांना आत्ताच कशी काय झाली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एका पणजीकराने दिलेली प्रतिक्रिया मात्र इथे महत्त्वाची ठरली आहे. ‘देणार्याने देत राहावे, घेणार्याने घेत राहावे, पणजीसाठी मत देताना मात्र मतदाराने सजग राहावे’.
Monday, 28 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment