सुरक्षा तोडून कक्षातच घुसले
वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): सडा उप कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांच्या कक्षात घुसून येथील चार कैद्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून या प्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. खुद्द उप कारागृहाची सुरक्षा तोडून हे कैदी पेडणेकर यांच्या कक्षात घुसल्याने कारागृहाच्या सुरक्षेवरच भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सडा येथे असलेले हे उप कारागृह गेल्या काही काळापासून कैद्यांच्या पलायनामुळे तसेच अन्य बाबींमुळे चर्चेत असतानाच आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. मुरगाव पोलिसांच्या माहितीनुसार, काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. भानुदास पेडणेकर सडा उप कारागृहातील आपल्या कक्षात व्यस्त असताना अचानक तिथे बालेश देसाई, कृष्णा देसाई, अमोघ नाईक व अमय नाईक हे चार खटले सुरू असलेले कैदी आत घुसले. त्यांनी बालेशची येथून दुसर्या उप कारागृहात बदली मागण्यात आली आहे काय, याबाबत पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसे झाल्यास पेडणेकर यांना जिवे मारण्यात येईल, अशी धमकी त्यांनी यावेळी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, बालेश याने पेडणेकरांच्या कुटुंबीयांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर आज दुपारी श्री. पेडणेकर यांनी मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून सदर कैद्यांविरुद्ध भा. दं. सं ३५३, ५०६ (२) आर | डब्ल्यू ३४ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सूत्रांनुसार या चौघाही कैद्यांना खून प्रकरणात या कारागृहात ठेवण्यात आले असून त्यांच्यावरील खटला सुरू आहे. मुरगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Saturday, 5 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment