‘गोवा लोकशाही मंच’तर्फे आज आमोण्यात जाहीर सभा
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना थेट आव्हान देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ‘गोवा लोकशाही मंच’तर्फे उद्या २७ रोजी आमोणा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानजवळ एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सरकारी इस्पितळांचे ‘पीपीपी’द्वारे खाजगीकरण व बेकायदा खाण व्यवसायाविरोधात जोरदार दंड थोपटण्यात येणार आहेत.
ऍड. नार्वेकर यांनी सध्या ‘गोवा लोकशाही मंच’च्या माध्यमातून आपल्याच सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. म्हापसा, कळंगुट येथील जाहीर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पाळी मतदारसंघाकडे वळविला आहे. पाळी मतदारसंघावर विश्वजित राणे आपले वर्चस्व असल्याचा दावा करतात. पाळीचे आमदार प्रताप गावस यांना विश्वजित यांनीच निवडून आणल्याचे बोलले जाते. आता ऍड. नार्वेकर यांनी पाळी मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन करून सरकारी इस्पितळांचे खाजगीकरण व बेकायदा खाणींविरोधात दंड थोपटण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खाणउद्योग चालतो. त्यामुळे उद्भवणार्या समस्यांना तेथील लोक रोज तोंड देत आले आहेत. पाळीतील खाणप्रभावित लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यास आमदार प्रताप गावस यांना अपयश आल्याचा दावा त्यांचे विरोधक करीत आहेत. सध्या आमोणे येथील ‘सेझा गोवा’च्या पीग आयर्न प्रकल्पाच्या विस्तारीकरणावरून वातावरण बरेच तापले आहे. या विस्तारीकरणामुळे आमोणे भागातील लोकांना प्रदूषणाचा मोठा त्रास होईल अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात तेथील लोक बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून २८ रोजी जाहीर जनसुनावणीचे आयोजन केले आहे. या जनसुनावणीच्या पूर्वसंध्येलाच ही बैठक होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘गोवा लोकशाही मंच’च्या या सभेला माजी आमदार प्रकाश फडते, कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते खेमलो सावंत हजर राहणार आहेत. पाळी मतदारसंघातील लोकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजेरी लावून सरकारच्या झुंडशाहीविरोधात एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sunday, 27 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment