विश्वजितचा नार्वेकरांना टोला
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
गेली अनेक वर्षे राजकारणात असल्याचा टेंभा मिरवणार्या, आरोग्यमंत्री पदाबरोबरच अनेक खात्याची मंत्रिपदे भोगलेल्या आणि या मंत्रिपदाच्या कार्यकालात कोणतेही भरीव काम न केलेल्यांनी आता आम्हांला शहाणपणा शिकवू नये, असा सणसणीत टोला दयानंद नार्वेकर यांचे नाव न घेता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लगावला.
आज (गुरुवारी) आरोग्य संचालनालयात एका कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना आमदार तथा माजी मंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी सुरू केलेल्या ‘पीपीपी’विरोधी सभांबद्दल विचारले असता विश्वजित यांनी वरील प्रतिपादन केले. स्वतः आरोग्यमंत्री असताना हळदोण्यासारख्या आपल्या मतदारसंघात एक दर्जात्मक आरोग्यकेंद्रही उभे न करू शकलेल्या आमदाराने आपल्यावर टीका करावी हेच मुळी हास्यास्पद आहे. अशी टीका करण्याआधी त्यांनी गेल्या चार वर्षात आपण राबवलेल्या आरोग्यविषयक धोरणांचा व निर्माण केलेल्या सुविधांचा अभ्यास करावा व मगच तोंडाची वाफ दवडावी, असा खोचक सल्लाही विश्वजित यांनी ऍड. नार्वेकरांना दिला.
‘पीपीपी’ होणारच
म्हापसा जिल्हा इस्पितळ हे खाजगी तत्त्वावरच (पीपीपी) चालू होणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांत ‘पीपीपी’वरच अनेक प्रकल्प चालू आहेत, असे या वेळी आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कुणीही कितीही विरोध केला तरी सदर प्रकरणी सरकार अजिबात माघार घेणार नाही हा पवित्रा त्यांनी यावेळीही ठाम ठेवला. ‘पीपीपी’ धर्तीवर सदर इस्पितळ सुरू करण्याचे सर्व सोपस्कार सुरू असल्याची माहितीही श्री. राणे यांनी यावेळी दिली.
Friday, 4 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment