Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 February 2011

गोव्याचा सांभाळ करण्यास सज्ज व्हा!

* ‘गोंयच्या राखणदारांचोे आवाज’ संघटनेचे आवाहन
* १५ रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन
* इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याचा निर्धार

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): गोव्यात सर्वत्र अराजकता माजली आहे. राज्याच्या भवितव्याचा सौदा करून आमचे राजकीय नेते गोमंतकीयांना देशोधडीला लावण्यास पुढे सरसावले आहेत. प्रशासन निर्ढावलेले व असंवेदनशील बनले असून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या अराजक परिस्थितीत गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इजिप्तप्रमाणेच उठाव करण्याची वेळ आली आहे. ‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ संघटनेच्या झेंड्याखाली राज्यातील सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रितरीत्या ही चळवळ उभी करण्याचा संकल्प सोडला आहे. येत्या १५ मार्च रोजी आझाद मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करून या क्रांतीचा शंख फुंकला जाईल, अशी माहिती ऍड. यतीश नाईक यांनी दिली.
आज येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. नाईक बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्याची अस्मिता व वेगळेपण सांभाळून ठेवायचे असेल तर हीच शेवटची संधी आहे व त्यासाठी राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. पर्यटन, खाण व बांधकाम व्यवसायावर सरकारचे कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. एकीकडे गरीब जनतेला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत तर दुसरीकडे याच जमिनी अव्वाच्या सव्वा दरांत विकून काही लोक आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. आपल्याच भूमीत परकीय बनण्याची नामुष्कीच गोमंतकीयांवर ओढवली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर गोव्यात गोमंतकीय फक्त नावापुरताच राहील, अशी भीती ऍड. नाईक यांनी व्यक्त केली.
१५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध विषय हाताळले जाणार आहेत. त्यामध्ये पोलिस- ड्रग माफिया - राजकारणी साटेलोटे, प्रादेशिक आराखडा - २०२१, बेकायदा खाणी व खनिज वाहतूक, मोपा भूसंपादन, भारतीय नौसेना भूसंपादन, कचरा समस्या, पर्यावरणाचा र्‍हास, मेगा प्रकल्प, कोमुनिदाद जमिनींची विक्री, सेझ आदी विषयांचा समावेश असेल. शिवाय या सभेत काही महत्त्वाचे ठरावही घेण्यात येणार आहेत. त्यात गोव्यातील जमीन पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याकरिता राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा ठराव राज्य विधानसभेत मंजूर करावा, लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात यावे, मतदार यादी तयार करताना खबरदारी घेणे आदींचा समावेश असेल.
पुढील पिढीसाठी गोवा सुरक्षित राहावा यासाठी राज्यातील बहुतांश सामाजिक संघटना झटत आहेत. पण युवा पिढी मात्र अशा चळवळींपासून अद्याप दूर राहणेच पसंत करते. जोपर्यंत या क्रांतीची मशाल युवा पिढी आपल्या हातात घेत नाही, तोपर्यंत ही क्रांती यशस्वी होणे शक्य नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी होणार्‍या जाहीर सभेत युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व गोव्याच्या संरक्षणाची धुरा आपल्या हातात घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

No comments: