Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 27 February 2011

बेशिस्त खनिज वाहतुकीविरोधात कारवाई सुरू

- २२० ट्रकांना दंड, २० ट्रक जप्त
- उसगावात तिघांवर गुन्हा दाखल
- वाहतूक अधिकार्‍यांना धमक्या

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): राज्यात बेदरकार खनज वाहतूक विरोधातील जनतेच्या उद्रेकाची गंभीर दखल लोक लेखा समितीने (पीएसी) घेऊन सरकारी यंत्रणेला चांगलेच फैलावर घेतल्यानंतर आज (शनिवारी) या विरोधात जोरदार प्रत्यक्ष कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. राज्यातील विविध खाण प्रभावित भागात वाहतूक खात्याने सकाळपासूनच खनिज वाहतुकीविरोधात कारवाईला प्रारंभ केला. दिवसभरात एकूण २२० ट्रकांना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला, तर सुमारे २० ट्रक जप्त करण्यात आले. काही ठिकाणी ट्रकवाल्यांकडून कारवाईत अडथळे आणण्याचे प्रयत्न झाल्याचीही खबर असून त्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात खनिज वाहतुकीवर कोणतेच नियंत्रण राहिले नसल्याने स्थानिक जनता आक्रमक बनली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद ‘पीएसी’ बैठकीत उमटले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील ‘पीएसी’ समितीकडून वाहतूक, पोलिस, खाण व जिल्हाधिकार्‍यांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. खनिज वाहतुकीसाठी वाहतूक खात्याने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने ही कारवाई राबवण्यात येत आहे. आज सकाळपासूनच विविध ठिकाणी वाहतूक अधिकार्‍यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे खनिजमालवाहू ट्रक व्यावसायिकांत एकच खळबळ उडाली. आज दिवसभरात सुमारे २२० ट्रकांना दंड ठोठावण्यात आला तर वीस ट्रक जप्त करण्यात आले.
रिवण भागात जोरदार कारवाई
आमच्या सावर्डे प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार या भागात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त खनिजमाल वाहून नेणार्‍या सुमारे ५० हून जास्त ट्रकांना रिवण येथे चलन देण्यात आले. जोपर्यंत खनिज वाहतुकीला शिस्त येत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार अशी माहिती फोंडा वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक नंदकुमार आरोलकर यांनी दिली. एका ट्रकामध्ये जास्तीत जास्त १० टन खनिजमाल भरण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, तरीही १५ ते १७ टन माल भरला जात असल्याचे या मोहिमेत आढळून आले. दरम्यान, दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी सरकारने लवकरात लवकर बगल रस्त्याची मागणी पूर्ण करावी असे सांगितले. दिवसाला फक्त एक खेप मारून ट्रकमालक आणि ट्रकचालकांनाही परवडणारे नाही व अशाने या व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ ओढवेल असा इशारा त्यांनी दिला.
फोंडा भागात कारवाईला अडथळे
आमच्या फोंडा प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार आज धारबांदोडा, तिस्क, उसगाव आदी भागांत वाहतूक खात्याकडून जोरदार कारवाई सुरू केल्याने ट्रकचालक व मालकांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी ९.४५ च्या सुमारास उसगाव बगल रस्त्यावर खनिजमालवाहू ट्रकांची तपासणी सुरू करताच काही लोकांनी या कारवाईत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांनी फोंडा पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी नीलेश शिलकर, उल्हास पालकर आणि अर्जुन (नाव पूर्ण नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे या भागात खनिज वाहतूक ट्रकांची कशी दादागिरी चालते याचा अनुभव वाहतूक अधिकार्‍यांनाही पाहायला मिळाला. वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांनी काही ट्रक ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही ट्रकमालकांनी हितसंबंधी लोकांना सोबत घेऊन वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांच्या गाडीला घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. वाहतूक अधिकार्‍यांना कारवाई न करता ताबडतोब परत जाण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी एका इसमाने वाहतूक खात्याच्या जीप गाडीची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करीत आहेत.

No comments: