रिपोर्टिंग थेट गृहमंत्र्यांना
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पोलिस ड्रग माफिया प्रकरणाच्या चौकशीची माहिती पोलिस खात्याच्या कोणत्याही वरिष्ठ पोलिसांना उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात काय होते, नवीन काय माहिती हाती लागते, याचे थेट "रिर्पोर्टिंग' गृहमंत्र्यांना होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना "बायपास' का केले जात आहे, याबद्दल पोलिस मुख्यालयात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
यावीन बेनाईम ऊर्फ "अटाला' या प्रकरणाची कोणतीही माहिती वरिष्ठ पोलिसांकडे उपलब्ध नसते. ही माहिती काय उपलब्ध होत नाही, असा प्रश्न केला असता या प्रकरणाचे तपास करणारे अधिकारी कोणालाच कोणतीच माहिती देत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पोलिस तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेच स्पष्ट आहे.
सध्या पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बस्सी, महानिरीक्षक सुंदरी नंदा गोव्याच्या बाहेर असल्याने केवळ उपमहानिरीक्षक रवींद्र यादव या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मात्र त्यांनाही या प्रकरणाची अधिक माहिती उपलब्ध होत नसल्याने तेही यावर काय बोलावे असा उलट प्रश्न पत्रकारांना करतात. महानिरीक्षक सुंदरी नंदा या ८ महिन्याच्या प्रदीर्घ रजेवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्य साक्षीदार व "अटाला' याच्या खळबळजनक वक्तव्याचे चित्रीकरण करणारी लकी फार्महाऊस गोव्यात जबाब नोंद करण्यासाठी येण्याची शक्यता धूसर असल्याने गोवा पोलिसांचे एक पथक "स्वीडन'ला जाण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र त्याला अद्याप केंद्रीय गृहखात्याकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
Saturday, 28 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment