मडगाव, दि.२४ (प्रतिनिधी): गेल्या एप्रिल महिन्यापासून थकलेला पगार चुकता करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत टळून गेल्यावरही सरकारने त्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नसल्याने दक्षिण गोव्यातील कोमुनिदाद कर्मचारी उद्या बुधवार दि. २५ ऑगस्टपासून बैठ्या संपावर (पेन डाऊन) जाणार आहेत.
गेल्या एप्रिलपासून पगार मिळालेला नसल्याने कुटुंबाचा व्याप सांभाळणे कठीण होऊन बसल्याने व या पुढे या परिस्थितीत दिवस काढणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा बैठा संप मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
कूळ कायदा, मानशी कूळ संघटनांकडे देण्याचा निर्णय व सर्रास सुरू असलेले भूसंपादन यामुळे कोमुनिदादच्या उत्पन्नाचे स्रोत गेले व त्यामुळे त्या परावलंबी झाल्या. हे कायदे करताना सरकारने कोमुनिदाद कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा कोणताही विचार केला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवा शर्ती कोमुनिदाद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या आहेत, सर्व प्रकारचे सर्वेक्षण, जनगणना यासाठी त्यांना पाचारण केले जाते पण वेतनाचा मुद्दा येताच सरकार मागे हटते. यासाठी सरकारने आपणालाही सरकारी सेवेत सामील करून घ्यावे अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
Wednesday, 25 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment