Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 26 August 2010

गरिबी हटाव? छे.. गरिबी बढाव!

राज्यात 'बीपीएल'ची संख्या साठ हजारांवर
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): कॉंग्रेस पक्षाकडून "गरिबी हटाव'चा नारा देण्यात येत असला तरी मुळात हा पक्ष "गरिबी बढाव'च्या दिशेनेच मार्गक्रमण करीत असल्याचे आज खुद्द ग्रामीण विकास खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी उघड केले. गोव्यात दारिद्÷यरेषेखालील (बीपीएल) लोकांची संख्या केवळ तीन हजार होती; पण या गटात पात्र होण्यासाठी असलेल्या नियमांत दुरुस्ती करून "बीपीएल' लोकांची संख्या चक्क ६० हजार लोकांवर पोहोचवण्याचा पराक्रम चर्चिल आलेमाव यांनी केला आहे.
वाळपई येथे "बीपीएल' लोकांना घरगुती सिलिंडर व इंदिरा आवास योजनेअंतर्गत धनादेशांचे वाटप करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चर्चिल आलेमाव यांनी ही घोषणा केली. एकीकडे केंद्र सरकारकडून "बीपीएल' लोकांची संख्या कमी व्हावी यासाठी विविध योजनांची खैरात केली जात असतानाच, इथे गोव्यात मात्र कॉंग्रेस आघाडी सरकार "बीपीएल' लोकांच्या संख्येत भरमसाठ वाढ करण्यासाठीच वावरत आहे हे देखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. गोवा हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशातील अव्वल राज्य असल्याचा टेंभा सरकारकडूनच मिरवला जात असतानाच राज्यातील "बीपीएल' लोकांची संख्या ३ हजारांवरून थेट साठ हजारांवर पोहोचणे ही खरी तर सरकारसाठी शरमेचीच गोष्ट ठरली आहे.
वाळपई मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची खास उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी माहिती हक्क कायद्यासंदर्भात दिलेल्या व्याख्यानात दारिद्÷यरेषेखालील लोकांची संख्या वाढत असल्याने भारत हा भिकाऱ्यांचा देश असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचे म्हटले होते. गरिबीचे उच्चाटन होण्याची नितांत गरज आहे, पण त्यासाठी विविध योजनांचा बाऊ करून केवळ राजकीय लाभ उठवण्याची मानसिकता राजकीय नेत्यांत बळावत चालली आहे. तीन हजार "बीपीएल' लोकांची संख्या तब्बल साठ हजार लोकांवर पोहोचणे यावरूनच सरकारकडून होत असलेल्या विकासाच्या बाता व गोव्याच्या प्रगतीचे पोवाडे किती फोल आहेत, हे देखील उघड झाले आहे.

No comments: