Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 27 August 2010

सचित्र मतदार यादी छाननीसाठी उपलब्ध

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): गोवा राज्यातील मतदारांची अंतिम छायाचित्र मतदार यादी दि. १ जानेवारी २०१० ही पात्र तारीख धरून तयार करण्यात आली असून मतदारसंघनिहाय मतदारयाद्या छाननीसाठी सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दि. २६ ऑगस्ट २०१० पासून एका आठवड्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी आपली मतदार यादीतील नावे व छायाचित्रे तपासून घेण्याची विनंती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार तालुका मामलेदारांनी नवी मतदारयादी तयार केली आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचा आरोप पिळर्ण नागरिक समितीने केला होता. माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील मामलेदारांकडून मिळवलेल्या माहितीनुसार मतदारयादी तयार करण्यासंबंधीच्या नियमांची माहितीच मुळात मामलेदारांना नसल्याचेच स्पष्ट झाले होते. नव्या मतदारयादीत सुमारे पन्नास हजार नव्या मतदारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा समावेश असण्याची शक्यता समितीने वर्तविली आहे. ही यादी जाहीर केल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा समितीने दिला होता. आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नवी मतदारयादी जाहीर केल्याने समितीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments: