Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 27 August 2010

अधिवेशनावेळी माहिती का लपवली?

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): इस्रायली ड्रगमाफिया अटाला गोव्यातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिस खात्याने लपवून ठेवली असल्याची माहिती हाती लागली आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना अटाला गायब असल्याचे उघड झाले होते, तरीही पोलिसांनी ही माहिती का लवून ठेवली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अधिक माहितीनुसार म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी अटाला याला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्याच्यावर गोव्यात बेकायदा वास्तव्य करीत असल्याची तक्रार असून त्यासंदर्भात सुनावणीसाठी त्याला हजर राहण्यासाठी अदखलपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. दि. २९ जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी तो उपस्थित राहिला नसल्याने त्याच्या नावे वॉरंट काढण्यात आले होते. या आदेशानुसार त्याला ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
दि. १७ रोजी गोवा विधानसभा अधिवेशन सुरू झाले होते आणि दि. ६ ऑगस्ट रोजी त्याची सांगता झाली होती. दि. ६ ऑगस्ट रोजी गृहमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत, पोलिस ड्रगमाफिया प्रकरणाचा व्यवस्थित व योग्य दिशेने तपास सुरू आहे, असा दावा केला होता. अटालाच्या विरोधात अदखलपात्र वॉरंट काढूनही तो सापडत नसल्याची माहिती पोलिसांनी विधानसभेत का दिली नाही? ही माहिती त्यांनी का लपवून ठेवली? असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

No comments: