भाजपकडून सीबीआय चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पोलिस व ड्रग्स माफिया साटेलोटे प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटाला हाच गायब होण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणी सुरू असलेला तपास हा निव्वळ बनवाबनवी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटाला गायब होण्यामागे पोलिस महासंचालकांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही दोषी ठरतात, असा आरोप करून गृहमंत्री रवी नाईक यांचा या खात्यावर काहीही ताबा राहिलेला नसल्याने त्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री कामत यांनी त्यांचे खाते काढून घ्यावे, अशी जोरदार मागणी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आर्लेकर यांनी गृहखात्याची झडतीच घेतली. संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणातील मुख्य संशयित अटाला अशा रितीने अचानक गायब होण्यामागे पोलिसांचाच हात नसेल कशावरून, असा संशय व्यक्त करत निदान आता तरी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात यावी, अशी मागणीही श्री. आर्लेकर यांनी केली. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लकी फार्महाऊस हिने या महिन्याच्या अखेरीस जबानी देण्यासाठी गोव्यात येण्याची तयारी दर्शवल्याचे पोलिसांकडूनच सांगितले जात असताना याच काळात अटालाचे बेपत्ता होणे नेमके काय दर्शवते, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून अटाला याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. यावेळी दर सोमवारी गुन्हा विभागात हजेरी लावणे, किनारी भागात प्रवेश बंदी व गोवा सोडून न जाण्याच्या अटी त्याला घालण्यात आल्या होत्या. या अटींची पूर्तता होते की नाही याची खबर पोलिसांनी ठेवणे गरजेचे होते. अटाला हा ४ जुलैपासून बेपत्ता आहे, अशी माहिती आता समोर आल्याने या प्रकरणी पोलिसांचा बेबनावच उघड होतो, असा आरोपही यावेळी श्री. आर्लेकर यांनी केला. खुद्द गृहमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत दिलेल्या स्पष्टीकरणात याबाबत काहीच वाच्यता केली नाही, त्यामुळे त्यांच्याकडून विधानसभेची व पर्यायाने संपूर्ण जनतेचीच दिशाभूल झाल्याचा ठपका श्री. आर्लेकर यांनी ठेवला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसच सहभागी असल्याने स्थानिक पोलिसांकडूनच या प्रकरणाची निःपक्ष चौकशी होणार ही अपेक्षाच फोल ठरते. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना निवेदन सादर करण्यात आले होते परंतु त्यांनी याबाबत सरकारला काहीही निर्देश दिले नसल्याचेच स्पष्ट होते, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. जनतेच्या सुरक्षेची काळजी वाहणारे पोलिस खातेच गुन्हेगारी प्रकरणात अडकल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातील ड्रग्स व्यवहार प्रकरणी दिल्लीतील केंद्र सरकारला अवगत करून या प्रकरणी "सीबीआय' चौकशीची मागणी करण्यासाठी दबाव गट तयार केला जाईल, असेही श्री.आर्लेकर यांनी सांगितले.
Wednesday, 25 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment