पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): डोंगरपूर कळंगुट चौकात चरस विक्री करण्यासाठी आलेल्या डेव्हिड इब्राहिम (४५) या व्यक्तीला २ लाख २५ हजार किमतीच्या चरसासह अटक करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून टाकलेल्या छाप्यावेळी त्याच्याकडे २.३५ किलो चरस आढळून आला असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. तसेच त्याची झडती घेतली असता सापडलेले १३ हजार रुपये व एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. काल मध्यरात्री १२.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली.
याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार डेव्हिड इब्राहिम हा मूळ गांधीनगर हैदराबाद येथे राहणार असून काही महिन्यांपासून तो डोंगरपूर कळंगुट येथे राहण्यासाठी आला होता. या ठिकाणी तो एका भाड्याच्या खोलीत राहत होता. इब्राहिम हा अमलीपदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. काल रात्री तो चरस विकण्यासाठी कळंगुट येथील चौकात आला असता पोलिसांनी त्याची झडती घेतली असता सदर प्रकार उघडकीस आला.
इब्राहिम हा हैदराबाद येथून गोव्यात का आला होता, याची अधिक माहिती मिळू शकली नाही. अमलीपदार्थाचा व्यवसाय करण्यासाठी तो येथे आला होता का, याचा तपास कळंगुट पोलिस करत आहेत. तसेच, त्याचे कोणत्या संघटनेशी संबंध आहे का, याचाही शोध सुरू आहे. दरम्यान कळंगुट भागात रात्रीच्या वेळी अमलीपदार्थाची विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या विषयीची अधिक तपास कळंगुट पोलिस करत आहेत.
Wednesday, 25 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment