पणजी, वाळपई, दि. २३ (प्रतिनिधी): रसिका ऊर्फ रसिगंधा शेटये या तरुणीचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी फेटाळून लावला. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून यात बराच तपास व्हायचा बाकी आहे. तसेच अनेक पुरावेही गोळा करावयाचे आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी यावेळी केला.
गेल्या शुक्रवारी या अर्जावर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केल्यानंतर त्यावरील निवाडा आज दुपारी जाहीर करण्यात आला. या निवाड्याला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्याची तयारी अर्जदाराने चालवली आहे.
वाळपई येथील पोस्टमास्तर प्रकाश गाडगीळ यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्या रसिका वाळपई पोलिसांच्या ताब्यात आहे. तिला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले असून ही कोठडी दि. २५ ऑगस्ट रोजी संपते आहे. दरम्यान, पोलिसांनी रसिकाचा जप्त केलेला मोबाईल चाचणीसाठी अजूनही वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवलेला नाही. मोबाईलवर गाडगीळ यांचे अश्लील चित्रीकरण करून त्याद्वारे ती त्यांना ब्लॅकमेल करीत होती, असा आरोप तिच्यावर आहे. परंतु, अद्याप अशा प्रकारचे कोणतेही क्लिपिंग हाती लागलेले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, क्लिपिंग नाहीत तर मग रसिका कोणत्या गोष्टींवरून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करीत होती, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
रसिका आपल्याला धमकावत असून अन्य मोबाईल क्रमांकांवरूनही धमकीचे फोन येत असल्याने गाडगीळ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. पोलिसांनी त्या पत्रात असलेल्या मोबाईल क्रमांकांचा शोध लावला असून त्यातील एक क्रमांक रसिकाच्या प्रियकराचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्या प्रियकराला पोलिसांनी अजूनही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही.
Tuesday 24 August, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment