लास वेगास, दि. २४ : मेक्सिकोची २२ वर्षीय जिमेना नवारेत हिने मिस इंडियासह एकूण ८२ देशांच्या सुंदरींना मागे टाकत यंदाचा ब्रह्मांड सुंदरी अर्थात "मिस युनिव्हर्स' हा किताब पटकाविला आहे.
लास वेगास येथे एका शानदार समारंभात यंदाची "मिस युनिव्हर्स' निवडण्यात आली. मागील वर्षीची विजेती स्टेफिनिया फर्नांडिस हिने यंदाच्या ब्रह्मांड सुंदरीला सर्वोच्च मानाचा सौंदर्य मुकुट सोपविला. तेव्हा जिमेनाला अश्रू आवरत नव्हते. जमैकाची येंदी फिलिप्स उपविजेती ठरली. तसेच ऑस्ट्रेलियाच्या जेसिंटा कॅम्पबेलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मिस युक्रेन एन्ना पोस्लावस्कान चौथ्या तर मिस फिलिपीन्स व्हिसन राज पाचव्या क्रमांकावर राहिली.
वयाच्या १५ व्या वर्षीपासून मॉडेलिंग क्षेत्रात उतरलेली जिमेना ही "मिस युनिव्हर्स'चा किताब पटकाविणारी दुसरी मेक्सिकन सुंदरी ठरली आहे. यापूर्वी १९९१ मध्ये याच देशाच्या ल्युपिटा जोन्स हिने हा मान पटकाविला होता.
या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व २१ वर्षीय उषोशी सेनगुप्ता हिने केले. कोलकाता येथील "मिस इंडिया' स्पर्धेतील उषोशीला पहिल्या १५ सुंदरींमध्येही स्थान मिळविता आले नाही. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरली "मिस यूएसए' रिमा फकीह. या इतक्या मोठ्या जागतिक स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिलीच मुस्लीम अमेरिकी सौंदर्यवती ठरली. त्यामुळे तिने पुरस्कार मिळविला नसला तरी वर्तमानपत्रांच्या रकान्यांमध्ये ती लक्षवेधक ठरली.
Wednesday 25 August, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment