Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 23 August 2010

गोमेकॉमधील रॅगिंगप्रकरण दडपण्याच्या प्रयत्नांना जोर

पोलिसांना हवेत ठोस पुरावे!

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या सात विद्यार्थ्यांचे करण्यात आलेले रॅगिंगप्रकरण दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले असून या प्रकरणाचे आरोपपत्रही दाखल न करण्याचा विचार सध्या पोलिसांनी चालवला आहे. "आम्हांला या प्रकरणात काही ठोस आढळून आले तरच आरोपपत्र दाखल करू अन्यथा नाही',असे आज या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक विश्वेष कर्पे यांनी सांगितले.
पहिल्या वर्षाच्या सात विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याप्रकरणी शेवटच्या वर्षाच्या नऊ विद्यार्थ्यांना आगशी पोलिसांनी अटक केली होती, तसेच त्यांना महाविद्यालयाच्या वसतिगृहातून निलंबित करण्यात आले होते. मात्र या विद्यार्थ्यांना काही सनदी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळाल्याने हे प्रकरण न्यायालयात पोचण्यापूर्वी मिटवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे रॅगिंगला बळी पडलेल्या त्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोणीच वाली राहिलेला नाही, हेच सध्या स्पष्ट होत आहे.
वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या रॅगिंगला व छळवणुकीला कंटाळून दोन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणच सोडले आहे. तर, दोघांनी वसतिगृहातून आपले बस्तान हलवले आहे. त्यात रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे काम प्रशासनातर्फेच सुरू झाले असल्याने रॅगिंग केले तरी काही फरक पडत नाही, असाच काही संदेश सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळत आहे.
त्या सात विद्यार्थ्यांना केवळ गुडघ्यांवर उभे करून त्यांचा परिचय करून घेतला जात होता. या व्यतिरिक्त त्यांना काहीही केलेले नाही आणि यात काय मोठे झाले, असाही युक्तिवाद त्या नऊ विद्यार्थ्यांचे समर्थन करणारे करीत आहेत. या व्यतिरिक्त महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या असूनही, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

No comments: