हॉटेल व्यवस्थापकाच्या जबाबामुळे पुन्हा खळबळ
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): जामिनावर सुटलेला ड्रगमाफिया यानीव बेनाईम ऊर्फ अटाला हा पर्वरी येथील एंजल रिसॉर्टमध्ये प्रत्यक्षात केवळ तीनच दिवस राहिला असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापकाने दिलेल्या जबानीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उर्वरित दिवस अटाला कुठे राहत होता, याच तपास लावणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
अटाला २० दिवस या रिसॉर्टमध्ये राहत होता, असे पोलिस सांगत असले तरी प्रत्यक्षात तो तीनच दिवस या हॉटेलमध्ये वास्तव्य करून होता. दि. २४ जून रोजी त्याने हॉटेलची खोली आरक्षित केली. ती खोली त्याने दि. २५ रोजी सोडली. त्यानंतर पुन्हा दि. ३ जुलै रोजी आरक्षित केलेली खोली दि. ५ जुलै रोजी सोडली. गुन्हा अन्वेषण विभागाला रिसॉर्टचे व्यवस्थापक शंकर भाटीकर यांनी हा जबाब दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून अटाला याने आपण किनाऱ्यांपासून लांब राहत असल्याचे सिद्ध करण्यासाठीच ही बनवेगिरी केली असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याला किनारी भागापासून लांब राहण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार अटाला २० दिवस या हॉटेलमध्ये राहिला असून त्यासाठी त्याने ३० हजार रुपये भाडे भरले आहे. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली नसल्याने जामिनावर मुक्त असताना किनारी भागात ड्रग्सची विक्री करण्याचा प्रकार सुरू होता का, याबद्दलही शंका निर्माण झाली आहे. तसेच, ७ ऑगस्टपासून अटाला हॉटेलमधून बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतरही गुन्हा अन्वेषण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने का घेतले नाही? त्याच्या शोध घेण्यासाठी "लुकआउट' नोटीस काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल १८ दिवसाचा कालावधी का घेतला? असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्या या पलायनामागील सूत्रधार वजनदार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिसॉर्ट व्यवस्थापक भाटीकर यांनी दिलेल्या जबाबानुसार अटाला खोलीचे भाडे आगाऊ देत होता. त्यामुळे तो दि. २४ जून ते १३ जुलै पर्यंत या रिसॉर्टमध्ये होता, असा दावा त्यांनी केला आहे. यातही तफावत आढळून आली आहे. दि. ५ जुलै रोजी अटाला याने खोली सोडली तर दि. १३ जुलै पर्यंत या रिसॉर्टमध्ये तो कसा राहिला? दि. ५ जुलै रोजी हॉटेल सोडले तरी दि. १३ जुलै पर्यंत त्याने खोली आरक्षित का ठेवली? त्याच्या नावाने अन्य कोणी व्यक्ती या रिसॉर्टमध्ये राहत होती का? एकंदरीत या तारखांवरून दि. ५ जुलैपासूनच अटाला बेपत्ता झाला असावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दि. ५ जुलै ते २५ ऑगस्ट पर्यंत पर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी कोणताही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे तो भारतात आहे की भारताबाहेर पोचला, यावर पोलिस ठामपणे सांगू शकत नाही.
Friday, 27 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment