Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 25 August 2010

अटाला बेपत्ता झाला की केला?

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ड्रगमाफिया अटाला बेपत्ता झाल्याने राज्य पोलिस खात्याचे धाबे दणाणले आहे. तर, अटाला बेपत्ता झाल्याने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असल्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी आज स्पष्ट केले आहे. तसेच, सर्व पोलिस स्थानकांत त्याचा शोध घेण्यासाठी संदेशही पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,४ जुलै पासून अटाला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून त्याच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी असलेले पोलिस अधिकारी काय करीत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अटाला बेपत्ता झाला की त्याला बेपत्ता करण्यात आला, असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
आज दिवसभरात कोणताही वरिष्ठ पोलिस अधिकारी या विषयावर बोलायला तयार नव्हता तर, पोलिस ड्रगमाफिया प्रकरणाचे तपास अधिकारी उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर "आऊट ऑफ कव्हरेज एरिया' होते. या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही माहिती नसून तुम्ही तपास अधिकारी साळगावकर यांच्याशीच संपर्क साधा, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगत होते. पोलिस ड्रगमाफिया प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असलेला अटाला बेपत्ता झाल्यास या प्रकरणाची फाईलच बंद होणार आहे, त्यामुळेच त्याला बेपत्ता करण्यात आला असावा, अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे.
""पोलिस माझ्याकडून हप्ता घेत होते व माझ्या माणसांना सोडून देत होते. तसेच न्यायालयाच्या मालखान्यातून ड्रग्सचा पुरवठाही मला पोलिस अधिकारी करतात'' अशी फुशारकी मारणाऱ्या अटालाचा व्हिडिओ "यू ट्यूब'वर झळकताच सात पोलिस निलंबित झाले होते. यात एका निरीक्षकाचाही समावेश होता. तसेच राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांचा मुलगा रॉय नाईक याचाही या रॅकेटमध्ये समावेश असल्याच आरोप झाला होता.
दि. ९ मार्च रोजी एका नाट्यमय घटनेनंतर अटाला याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दि. २४ जून रोजी त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. यावेळी गोवा न सोडण्याचे आदेश देत प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी गुन्हा अन्वेषण विभागात हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर त्याने एकही दिवस गुन्हा अन्वेषण विभागात हजेरी लावली नाही, असे सूत्रांनी सांगितले. जामीन मिळाला त्याच दिवशी तो किनारी भागात गेला होता. काही दिवसानंतर त्याने पर्वरी येथील आग्नेल रिसॉर्टमध्ये खोली क्रमांक १५४ मध्ये वास्तव्य केले होते. यानंतर त्याने १०१ या क्रमांकाची खोली आरक्षित केली होती. दि. ४ जुलै रोजी अटालाने हे रिसॉर्ट सोडल्यानंतर तो कुठे गेला, याचा शोध घेण्याचा साधा प्रयत्नही पोलिसांनी केला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------------------------------------------
जामीन मिळाल्यानंतर अटाला याला भेटण्यासाठी कोण कोण येत होते, तो कोणाच्या संपर्कात होता, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही गुन्हा अन्वेषण विभागाची होती. मात्र ते करण्यास "सीआयडी' विभाग पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत बोलताना मान्य केले. गृहमंत्री रवी नाईक यांचा मुलगा रॉय नाईक त्याला भेटण्यासाठी त्याच्या शिवोली येथील घरी जात होता, असा आरोप यापूर्वी झाला आहे हे उल्लेखनीय!

No comments: