Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 22 August 2010

'बाणावलीवर आमचाच हक्क'

राष्ट्रवादीने कॉंग्रेसला ठणकावले
ड्रगप्रकरणाची सीबीआय चौकशीच व्हावी

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): बाणावली मतदारसंघातून आमचाच उमेदवार निवडणूक लढवेल, त्यावरून वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आमच्या पक्षाचा दावा बाणावलीबाबत कायम राहणार आहे, अशा स्पष्ट शब्दांत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत कॉंग्रेसला ठणकावले. तसेच ड्रग माफिया, पोलिस व राजकीय नेते यांचे साटेलोटे प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीचा पुनरुच्चार करताना यासंदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कॉंग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपली कन्या वालंका हिला बाणावली मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तर वालंका हिला स्वतंत्रपणे रिंगणात उतरवू, अशी घोषणा करून चर्चिल यांनी कॉंग्रेसलाही आव्हान दिले आहे. या रणधुमाळीतच सदर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम राहणार असल्याचे पक्ष प्रवक्ते ट्रोझन डिमेलो यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यातील कलगीतुरा बाणावली मतदारसंघावरून रंगत गेल्यास आश्चर्य वाटू नये.
दरम्यान, ड्रग प्रकरणाची चौकशी "सीबीआय' मार्फतच व्हायला हवी या मागणीसाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेणार आहे. ड्रग माफिया, पोलिस व राजकीय नेते यांचे साटेलोटे असलेल्या या प्रकरणाचा संबंध दहशतवादी संघटनांशीही असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज पणजीत झाली. या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत पक्ष प्रवक्ते डिमेलो यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
ड्रग प्रकरणामुळे कॉंग्रेस आघाडी सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे व त्यामुळे "सीबीआय'चौकशी झाली तरच त्यामागील नेमके सत्य उजेडात येईल. गृहमंत्री रवी नाईक यांच्याशी कोणतेही राष्ट्रवादीचे वैर नाही. खुद्द रवी नाईक यांनीच शिवाय काही आमदारांना ड्रग माफियांकडून हप्ते मिळतात,असा आरोप केला होता. त्यामुळे हे सगळे गुपित उघड व्हायचे असेल तर त्याची "सीबीआय'चौकशीच होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री त्यास मान्यता देत नसतील तर प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही शिष्टमंडळ घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही,असे डिमेलो यांनी संकेत दिले. तसेच ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अधिवेशन म्हापसा येथील सिरसाट हॉलमध्ये होणार असून त्यास महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव मुख्य वक्ते असणार आहेत तर सांवतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचीही विशेष उपस्थिती असेल.
गोमंतकीयांसाठी स्वस्तात भूखंड
राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर हे राज्य गृहनिर्माण विकास मंडळामार्फत खास योजना तयार करीत आहेत. या योजनेअंतर्गत गोमंतकीय परवडतील पगारदार व्यक्ती खरेदी करू शकेल,असे सुमारे १५० चौरसमीटर जागेचे भूखंड तयार करणार असून त्याची विक्री केवळ गोमंतकीयांनाच केली जाणार आहे. नागरी पुरवठामंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी आपले वजन वापरून व शरद पवारांकडून गोव्यासाठी अतिरिक्त तांदूळ पुरवठा मान्य करून घेतला आहे. गोव्याला २७०० मेट्रिक टन तांदूळ मिळणार असून ११ किलो तांदूळ प्रति रेशनकार्ड मिळणार आहे. गणेश चतुर्थी, दिवाळी व नाताळांसाठी अतिरिक्त साठ्याचाही प्रस्ताव पाठवण्यात आला असून या उत्सवांनिमित्त अतिरिक्त १५ किलो तांदूळ मिळणार आहेत.

No comments: