Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 28 August 2010

लाखोंच्या बनावट सीडी पणजीत जप्त

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): येथील नव्या मार्केट कॉंप्लेक्समधील पहिल्या मजल्यावर आज पोलिसांनी छापा टाकून 'टी सीरिज' कंपनीच्या ३४ लाख ८७ हजार ५०० रुपयांच्या बनावट "डीव्हीडी' व "एमपी-थ्री' जप्त केल्या. मुंबईतील सुपर कॅसेट इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईअंतर्गत असीफ कासीम शेख (तांबडीमाती ताळगाव), मौलाअली नूर अहमद (चिंबल), इस्माईल झाबी मकदर (चिंबल) व ख्वाजा मौलासाब नावीर (चिंबल) यांना अटक करून जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
टी-सीरिजचे अधिकारी रिओन जोझफ व देवानंद नाईक हे आज मुंबई येथून खास चौकशीसाठी गोव्यात आले होते. यावेळी त्यांनी पणजी शहरात फिरून पाहणी केली असता त्यांना पणजी मार्केट कॉंप्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर दुकान क्रमांक १५७, फर्रान एंटरटेन्मेंट, व्हिडीओ प्लॅनेट व मुव्ही वर्ल्ड या दुकानांत हा टी सीरिजच्या बनावट "डीव्हीडी' आणि "एमपी थ्री'ची विक्री होत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पणजी पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ८ हजार ३०० सीडी जप्त करण्यात आल्या. सर्व संशयितांवर कॉपीराइट कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयीचा तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर करत आहेत.

No comments: