Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 1 June 2010

पावसामुळे दिलासा.. पण

पणजी, दि. ३१ - गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून जणू एखाद्या भट्टीत फेकल्याप्रमाणे अवस्था झालेल्या गोवेकरांना दोन दिवसांच्या पावसामुळे जोरदार दिलासा मिळाला. मात्र, एकीकडे असा दिलासा मिळाला असतानाच वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने या आनंदावर विरजण पडलेच. विशेषतः विविध आस्थापनांमधील काम संपवून मध्यरात्री घराकडे निघालेल्या मंडळींची विलक्षण तारांबळ उडाली.
काल रात्री अकरानंतर पणजी व आसपासच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. जोडीला विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होताच. त्यामुळे प्रामुख्याने बच्चे कंपनीचा भीतीने थरकाप उडाला. त्यांनी आपल्या पालकांच्या कुशीतच रात्र काढणे पसंत केले. युवावर्गाने मात्र या पावसाची मस्त मजा लुटली. पणजी परिसरात अनेक कुटुंबांतील मोठ्या व्यक्तींनी मध्यरात्रीपर्यंत पावसात भिजून जणू वर्षासहलीचा आनंद घेतला. पणजी वेधशाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २३ अंश सेल्सियस नोंदले गेले. येत्या ४८ तासांत हवामान ढगाळ असेल आणि गोव्याच्या काही भागांत तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे पावसाचा वेग वाढत गेला आणि राजधानी पणजीच्या विविध भागांत काळोख पसरला. अखेर पहाटे पाचच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. तोपर्यंत लोकांना अक्षरशः तळमळत रात्र काढावी लागली. पंखे बंद असल्याने पावसाळ्यात हमखास येणारे विचित्र कीडे व डासांचा त्रास आणि जोडीला उकाडा अशा दुहेरी संकटाला प्रामुख्याने फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेकांच्या जिवाची तगमग झाली आणि चीडचीड वाढली. पहाटे जरा कोठे डोळा लागतो म्हणेपर्यंत कोंबडा आरवलासुद्धा.

No comments: