अधिकृत नियतकालिकात राजभाषेलाच डावलले
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोवा घटक राज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "नवेपर्व' या त्रैमासिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. राज्य सरकारचे अधिकृत नियतकालिक इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध करून त्यात राजभाषेला पूर्णपणे डावलण्यात आल्याने अनेकांत संतापाची लाट पसरली आहे. सरकार दरबारी कोकणी व मराठीला डावलून इंग्रजीचे स्तोम माजवण्याची सवय तातडीने मोडून काढली नाही तर येत्या काळात गोव्याची अस्मिता संपण्याची शक्यता असल्याची संतप्त टीकागोवेकरांनी केली आहे.
राज्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे प्रकाशित होणारे "नवेपर्व' हे नियतकालिक गेल्या काही काळापूर्वीच बंद पडले होते. या नियतकालिकाला घटक राज्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने ऊर्जा प्राप्त करून देण्याच्या हेतूने सरकारने पावले उचलली व त्यासंबंधी संपादकीय मंडळ स्थापन करून नव्याने "नवेपर्व'चे प्रकाशन करण्यात आले. घटकराज्य दिनानिमित्त "नवेपर्व' नियतकालिकाचा अंक प्रकाशित झाला खरा; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारचे अधिकृत नियतकालिक राजभाषेतून प्रसिद्ध होईल, अशी अनेकांची मनीषा होती. ती पूर्ण फोल ठरली आहे. विशेष म्हणजे या नियतकालिकात केवळ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा संदेशच कोकणी भाषेत आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी सल्लागार सुरेश वाळवे यांचा एक मराठी लेख वगळता इतर सर्व लिखाण इंग्रजीतूनच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कोकणी ही गोव्याची राजभाषा व मराठीला समान दर्जा या पायावरच गोव्याला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला. घटक राज्य दिन साजरा करताना याचाच सरकारला विसर पडावा हे दुर्दैव असल्याची टीका अनेकांनी केली आहे. घटक राज्य व कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे, असा डंका पिटणारे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचा या नियतकालिकात इंग्रजीतून लेख प्रसिद्ध झाला आहे. मराठीला राजभाषेचा समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी लढ्याचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय कायदामंत्री तथा विद्यमान कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनीही इथे इंग्रजीतूनच लिहिणे पसंत केले आहे. प्रशासकीय पातळीवर राजभाषेचा वापर होणे गरजेचे आहेच, पण त्याला काही अवधी जाईल हे मानता येणे शक्य आहे. तथापि, ज्या ठिकाणी राजभाषेचा मान राखायलाच हवा तिथेही कोकणी व मराठीची खुलेआम अवहेलना होत असेल तर हा प्रकार गोमंतकीय कसे काय खपवून घेतील, असाही सवाल अनेकांनी केला. सरकारचे अधिकृत नियतकालिक हे मराठी व कोकणीतूनच प्रसिद्ध व्हावे. एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकारी किंवा अन्य कुणी तज्ज्ञ या नियतकालिकात इंग्रजीतून लिखाण करीत असेल तर त्या लेखाचा स्थानिक भाषेत अनुवाद करून तो प्रसिद्ध करावा,अशीही मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे "लोकराज्य' हे सुंदर व दर्जेदार मासिक प्रसिद्ध करण्यात येते. पूर्णपणे मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारे हे मासिक खऱ्या अर्थाने प्रशासनाचा चेहरा ठरला असून सरकारी योजना, विकासकामे व संपूर्ण प्रशासकीय माहिती सामान्य लोकांना त्यांच्या भाषेतून मिळवून देण्याचे कार्य हे मासिक करीत असते. गोवा सरकारनेही "लोकराज्य' च्या पावलावर पाऊल ठेवून "नवेपर्व' नियतकालिकाचे नियोजन करावे व खऱ्या अर्थाने हे नियतकालिक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल याची सोय करावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.
Sunday, 30 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment