Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 June, 2010

नादिया मृत्युप्रकरण 'सीआयडी'कडे

अटकपूर्व जामिनासाठी नादियाचा पती कोर्टात
- लोटली दफनभूमीत नादियावर अंत्यसंस्कार
- मिकींना वगळण्याच्या मागणीला जोर

मडगाव, पणजी दि. २ (प्रतिनिधी): रेटॉल घेतल्यामुळे उदरातील तमाम अवयव निकामी होऊन मृत झालेल्या सौ. नादिया जोएला तोरादो मृत्युप्रकरण राजकीय वळण घेऊ लागल्याने तपासासाठी आज "सीआयडी'कडे सोपवण्यात आले आहे. यापुढे या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हा अन्वेषण विभाग करणार असल्याचे पोलिस खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच, नादिया मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिस खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भा.दं.सं ३०६ कलम लावण्यात आल्याचेही स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे एका प्रकारे पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. नादियाच्या पार्थिवावर आज सकाळी लोटली चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, नादिया याच्या पतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असल्याची माहिती मिळाली आहे. नादियाचे पती व्हिन्सटन बारेर्टो यांनी या प्रकरणात पोलिस आपला छळ करीत असल्याचा आरोप करून अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे या प्रकरणातून घोंघावलेले वादळ अधिकाधिक विस्तारीत होत असल्याचे दिसत आहे.
त्यांच्या या अर्जावर उद्या सकाळी १० वाजता सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आपल्या अर्जांत त्यांनी पोलिस या प्रकरणात आपला विनाकारण छळ करीत असल्याने ते आपणाला अटक करतील अशी भितीही व्यक्त केली आहे. पर्यटनमंत्र्यांना विविध न्यायालयीन प्रकरणात कायदेशीर सल्ला देणारे ऍड. श्रीकांत नाईक यांनीच बार्रेटो यांच्यावतीने हा अर्ज सादर केला आहे.
नादियाने बार्रेटोकडील घटस्फोटासाठी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यातही नाईक हेच तिचे वकील होते हे या प्रकरणातील आणखी एक वैशिष्ट्य मानले जाते.
नादिया व बार्रेटो यांचा विवाह २७ फेब्रुवारी २००४ मध्ये झाला होता. पण त्यानंतर तिने आपल्या पतीविरुध्द तो आपला छळ करीत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिने २००८ मध्ये घटस्फोटासाठी केलेल्या अर्जातही नवऱ्याकडून होणारा छळ हेच कारण दिले होते. तर बार्रेटोने आपल्या अर्जात तिचे "मिकी'कडील असलेले संबंध हे कारण दिले होते, असे सूत्रांनी सांगितले. तिच्या मृत्यूच्या चौकशीच्या निमित्ताने पोलिसांकडून छळ सुरू झाला असून ते कधीही येतात व त्रास करतात, त्यांनी आपला लॅपटॉप मोबाईल ताब्यात घेतला आहे व ते आपणास अटक करून तुरुंगात डांबतील, अशी भिती बार्रेटो यांनी अर्जात व्यक्त केली आहे.
या प्रकरणात पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे या ना त्या प्रकारे गोवले गेल्याचा आरेाप करून भाजपने यापूर्वीच त्यांना वगळावे अशी मागणी केली आहे. तर काल मडगावात झालेल्या विविध महिला संघटनांनीही तशीच मागणी करून एकप्रकारे सरकारवर दडपण आणले आहे.आज सवेराच्या झेंड्याखाली मुख्यमंत्र्यांच्या येथील निवासावर चाल करून त्यांना वगळावे व या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करून तारा केरकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. "बायलांचो एकवटने'ही अशाच प्रकारचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सादर केले आहे.
आज सकाळी साराचे पार्थिव तिच्या लोटली येथील निवासांतून लोटली चर्चमध्ये नेेले गेले व तेथे धार्मिक विधी व प्रार्थना आटोपल्यावर दफनभूमीत नेऊन दफन करण्यात आले. पार्थिव चर्चमध्ये आणण्यापूर्वीच मिकी पाशेको चर्चमध्ये दाखल झाले होते व शवपेटी चर्चमधून दफनभूमीत नेताना एका बाजूने त्यांनी ती पकडली होती असे सांगण्यात आले.
--------------------------------------------------
मिकींना नव्याने समन्स
मडगावः या प्रकरणात सध्या संशयाच्या घेऱ्यांत सापडलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांची जबानी नोंदविण्यासाठी उद्या त्यांना नव्याने समन्स पाठवून पोलिस स्टेशनवर पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. काल तांत्रिक चुकीमुळे उशिरा समन्स पाठविले गेले व त्यामुळे त्याची कार्यवाही होऊ शकली नाही व त्यासाठी आज पुन्हा नवे समन्स जारी केले गेले व त्यानुसार उद्या मिकी यांची जबानी नोंदली जाईल .
मंत्रिमंडळातून वगळाः आवडा
दरम्यान, नादियाने रेटॉल घेऊन केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतरच्या एकूण एक घडामोडी पाहिल्या तर या एकंदर प्रकरणात पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचा असलेला संबंध उघड होत आहे व म्हणून सार्वजनिक जीवनातील नीतिमत्तेला अनुसरून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा आदेश द्यावा वा त्यांना मंत्रिपदावरून वगळावे, अशी मागणी बायलांचो एकवटच्या अध्यक्षा आवडा व्हिएगश यांनी आज दुपारी येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
त्या म्हणाल्या, नादियाने विष घेण्याचा प्रयत्न केल्यापासून आजवर आपण उघडरीत्या या प्रकरणात भाष्य केले नव्हते ते ती घटना दुर्दैवी असल्यामुळेच. पण आपल्यापरीने आपण माहिती गोळा केलेली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची माहिती दिली व सांगितले की या प्रकरणात प्रत्येक बाबी संशयास्पद असतानाही तपास यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले आहे. पर्यटनमंत्री या प्रकरणात कसकसे गोवले गेलेले आहेत ते त्यांनी उदाहरणासह दाखवून दिले व सांगितले की मयत नादिया हिने आपल्या पतीला पाठविलेले एसएमएस हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे ठरणे शक्य आहे व म्हणून तपास यंत्रणांनी त्यांचा भ्रमणध्वनी ताब्यात घेऊन ते गोळा करावेत, अशी मागणी केली आहे.
नादियाने स्वतः रेटॉल घेतले की तिला ते पाजले गेले, तिने ती कुठून मिळवले, तिने घेतलेले असल्यास त्याची रिकामी ट्यूब कुठे गेली, तिने ते पेस्ट म्हणून वापरले तर पूर्ण ट्यूब कशी घेतली, पुरावा म्हणून पोलिसांनी ती ताब्यात का घेतली नाही, तिला घरातून इस्पितळात नेण्यास सहा तास का लागले, तिला प्रत्येक ठिकाणी हलविण्यासाठी पर्यटनमंत्र्यांचीच गाडी का लागली, इस्पितळात तिची आई हजर असताना मिकी यांनी सह्या का केल्या, पोलिसांनी तिला गोव्यातून हलविण्यापूर्वी तिची जबानी कां नोंदवली नाही, असे अनेक सवाल आवडा यांनी केले व पर्यटनमंत्र्यांना पदावरून बाजूस केल्याशिवाय या प्रश्र्नांची उत्तरे मिळणार नाहीत,असा दावा केला.
मंत्र्यांच्या दडपणामुळेच हे प्रकरण रेंगाळले का,असे विचारता आपला पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्र्वास आहे, असे त्या म्हणाल्या. नादियाच्या कुटुंबाची या प्रकरणी कोणतीच तक्रार नाही मग तुम्ही हे प्रकरण का लावून धरता, असे विचारता त्या कुटुंबाने काल जो बिगरसरकारी संघटनांविरुध्द गळा काढला त्यामुळेच आपणाला समोर यावे लागले, असे त्या म्हणाल्या.
या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यावयाची असेल तर नादियाने तिच्या नवऱ्याला पाठविलेले एसएमएस पुढे यावे लागतील असे सांगून मुंबईत नोंदविलेल्या मृत्युपूर्व जबानीबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला.
यावेळी बोलताना दोगी बदमास सिडीफेम कल्वर्ट गोन्साल्वीस यांनी पर्यटनमंत्र्यांचे हे पहिलेच प्रकरण नाही तर त्यांची पहिली पत्नी सारा हिनेही असाच आत्महत्येचा प्रयत्न केला होता तर ज्युवेलीन या दोन मुलांच्या मातेने दोनदा तसा प्रयत्न केला आहे, त्यावरून एकंदर मानवी विकृती उघड होते. त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन २००३ पासूनच्या एसएमएसची तपासणी केली तर मोठी प्रकरणे उघडकीस येतील असा दावा केला. त्यांना मंत्रिपदावरून हटविले तर अनेकजण आपणहून पोलिसांना माहिती पुरविण्यासाठी पुढे येतील, असे ते म्हणाले.
या प्रकरणी बायलांचो एकवटने राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी ,मुख्यमंत्री,गृहमंत्री, राज्यपाल ,दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना एक निवेदन सादर करून याप्रकरणात संशयाच्या विळख्यात सापडलेले मिकी पाशेको यांना मंत्रिपदावरून वगळावे अशी मागणी केली आहे.

No comments: