पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्याचे युवा आरोग्यमंत्री गेला महिनाभर ना पर्वरीला फिरकले आहेत, ना ते मतदारसंघात आहेत. अधिक चौकशी करता, ते परदेशात असल्याची माहिती मिळाली. राज्यातील बहुतेक मंत्री पर्वरी येथील मंत्रालयात येत नसल्याचे आता सुपरिचित आहे, त्यापैकी एक मंत्री मैत्रीण आत्महत्या प्रकरण मिटविण्याच्या कामात गुंतले आहेत, तर अनेक जण बंगल्यांवरून कारभार हाकत आहेत, अशा जनतेच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. राज्याचे मंत्रिपद भूषविताना वारंवार परदेशी दौरे करणाऱ्या मंत्र्यांबद्दल जनतेमध्ये विशेष कुतुहल आहे. हे मंत्री महिनाभर नसले तरी खात्याचा कारभार व्यवस्थित चालतो का, हे दौरे सरकारी खर्चाने केले जातात की ते प्रायोजित असतात, असे प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रपती अथवा पंतप्रधानही परदेशी दौऱ्यावर गेले तरी आठवडाभरात परततात, मात्र गोव्याचे मंत्री महिनाभर राज्यापासून ( व आपल्या खात्यापासून) दूर राहात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे गोव्यात नसल्याने सत्तरीतील जनतेची गैरसोय होत असल्याचे आमच्या वाळपई प्रतिनिधीने कळविले आहे. अनेक कामांत राणे कार्यकर्त्यांना हरप्रकारची मदत करीत असतात. सत्तरीतील कोणताही कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीशिवाय होत नाही. गेल्या काही दिवसांत मंदिराच्या स्थापनेच्या सोहळा आमंत्रणपत्रिकेवर राणे यांचे नाव असल्याने अनेक गरजवंतांनी त्याठिकाणी धाव घेतली, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. राणे यांच्या अनुपस्थितीमुळे सध्या सत्तरी युवा मोर्चाच्या कार्यालाही खीळ पडली आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत, असे दिसून आले आहे. परदेशाची ओढ असलेले मंत्री राज्यातील जनतेला न्याय देऊ शकतील का, अशी चर्चा त्या परिसरात चालू आहे.
Wednesday, 2 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment