Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 1 June 2010

बोरी येथून साखरवाहू ट्रक पळविला; दोन आरोपींना अटक

फोंडा, दि. ३१ (प्रतिनिधी) - बायथाखोल बोरी येथील बगल रस्त्यावरून ३० मे रोजी रात्री १० च्या सुमारास एक साखरवाहू ट्रक पळवून नेणाऱ्या टोळक्यातील दोघांना अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. या साखरवाहू ट्रकच्या चोरी प्रकरणाचा चोवीस तासात छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश प्राप्त झाले असून मालवाहू ट्रकसह सर्व २७ टन साखर हस्तगत करण्यात आली आहे. ट्रकच्या हौदाला अडकलेली एक काजूच्या फांदी आणि ट्रकाचा टायर कच्चा रस्त्यावर घासण्यात आल्याचे डाग या धाग्यादोऱ्याच्या आधारावरून पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम अब्दुल सतार मुल्ला (२७, रा. घोगळ मडगाव) आणि सलमान नबीजान खान (२५, नेसाय मडगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. धारवाड येथील राजासाब हुसेन अन्नेगिरी यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. राजासाब यांनी दोन मालवाहू ट्रक
एम.पी.टी. वास्को येथे साखर भरण्यासाठी पाठविले होते. त्यातील एक मालवाहू ट्रक २९ मे रोजी वास्को येथील साखर घेऊन धारवाडला रवाना झाला. तर दुसरा ट्रक (क्र. केए २५ - सी - ४०४) हा ३० मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता वास्को येथून धारवाडला जाण्यासाठी रवाना झाला. ह्या ट्रकमध्ये २७ टन साखर होती. रात्री १० च्या सुमारास सदर मालवाहू ट्रक बोरी बायथाखोल येथे बगल रस्त्यावर पोहोचला होता. यावेळी ट्रकच्या मागून आलेली पांढऱ्या रंगाची "कॉलिस' जीप ट्रकाच्या समोर आडवी घालून ट्रक थांबविण्यात आला. ह्या जीपमध्ये चार जण होते. ट्रकच्या चालक व क्लीनरला ट्रकमधून खाली उतरण्याची सूचना जीपमधील व्यक्तींनी केली. आम्ही वास्को येथील पोलिस अधिकारी आहोत, असे ट्रक चालकाला सांगून वाहनाची कागदपत्रे दाखविण्याची सूचना केली. त्यानंतर त्यांना जीपमध्ये खाली मान घालून बसण्याची सूचना केली. आरडाओरड करू नका, अशी धमकी दिली. काही वेळाने जीपगाडी मडगाव दिशेने नेण्यात आली. त्यानंतर काणकोण परिसरात निर्जन स्थळी दोघांना सोडून देण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री ट्रक चालकाला ट्रकाच्या मालकाशी धारवाड येथे संपर्क साधण्याची संधी मिळाली. सदर घटनेची माहिती मालकाला दिल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास कर्नाटक पोलिसांकडून फोंडा पोलिसांनी या घटनेसंबंधी माहिती मिळाली. सकाळी ६ वाजता ट्रक मालक ट्रकचा चालक बसव रेड्डी आणि क्लीनर बसवराज राजू यांच्यासह फोंडा पोलीस स्टेशनवर येऊन ह्यासंबंधी रीतसर तक्रार दाखल केली. चालकांकडून मोबाईल, रोख दहा हजार रुपये पळविले होते. ट्रक पळवून नेणारे टोळक्यातील व्यक्ती कन्नड, हिंदी भाषा बोलत होते, असे ट्रकचालकाने सांगितले.
फोंडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली. वास्को, मडगाव ह्या भागात दोन पथके पाठविण्यात आली. तर एका पथकाने फोंडा भागात तपासकामाला सुरुवात केली. ३१ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास चोरीस गेलेला मालवाहू ट्रक बांदोडा येथे बगल रस्त्यावर वेबारशी स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यात फक्त एक टन साखर होती. सदर ट्रकची पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ट्रकच्या हौदाला एक काजूची फांदी अडकलेली दिसून आली. तसेच ट्रकचे टायर कच्चा रस्त्याला घासलेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रमुख मार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व कच्च्या रस्त्याची पाहणी करण्यास पोलिसांनी प्रारंभ केला. पणसुले धारबांदोडा येथे एका कच्च्या रस्त्यावर काजूची झाडे असल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर निरीक्षक सी.एल.पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. सदर ट्रक मोठा असल्याने कच्च्या रस्त्यावरून नेण्यात येत असताना कच्च्या रस्त्याच्या बाजूला घासला होता. तसेच रस्त्याच्या बाजूच्या काजूच्या झाडाच्या अनेक फांद्या मोडलेल्या स्थितीत होत्या. त्यामुळे पोलीस पथकाने तपासणीला सुरुवात केली असता. काही अंतरावर उघड्यावर काही लोक पिशव्यांमध्ये काही वस्तू भरीत असल्याचे दिसून आले. पोलीस येत असल्याचे पाहून काही जणांनी पळ काढला. तर दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. ट्रकातून चोरण्यात आलेली साखर पिशव्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. त्याठिकाणी पोलिसांना २६ टन साखर आढळून आली. ह्या प्रकरणात आंतरराज्य टोळी गुंतलेली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ह्याप्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत असून ह्या प्रकरणी कसून तपास केला जात आहे. उत्तर गोव्याचे अधीक्षक अरविंद गावंस यांनी फोंडा पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. विभागीय अधिकारी शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल.पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर व इतरांनी तपास केला.

No comments: