Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 31 May 2010

"त्या' नेत्याच्या मैत्रिणीचा अखेर मृत्यू

पंधरा दिवसांची धावपळ संपली - "सवेरा'कडून खुनाचा आरोप

मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यातील एका राजकीय नेत्याच्या विष घेतलेल्या मैत्रिणीचा अखेर पंधरा दिवसांनंतर काल रात्री चेन्नईतील अपोलो इस्पितळात मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर, हा नैसर्गिक मृत्यू नाही. पोलिसी ससेमिरा चुकवण्यासाठी तिला एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात हलवण्याचे जे प्रकार घडले त्यामुळे तिच्या औषधोपचारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे एकप्रकारे हा खुनाचाच प्रकार असल्याचा दावा "सवेरा' या बिगर सरकारी संघटनेच्या प्रमुख तारा केरकर यांनी केला आहे. या प्रकरणातील सत्य लोकांसमोर आणावे, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.
आपल्या राजकारणी मित्रासमवेत दुबईवारी करून परतल्यावर तिसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मे रोजी मूळ लोटली येथील व आता फातोर्डा येथे राहणाऱ्या सदर विवाहित महिलेला अत्यवस्थ स्थितीत येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिचा मनाविरुद्ध गर्भपात घडवून आणला होता व विमनस्क होऊन तिने "रेटॉल' घेतल्याचे सांगितले जात होते.
तिची गंभीर अवस्था पाहून लगेच तिला येथील व्हिक्टर अपोलो इस्पितळात हालविण्यात आले. तथापि, तोपर्यंत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची वार्ता सर्वत्र पसरली. नंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरी सल्ला झिडकारून तिला त्याच दिवशी रात्रीच्या विमानाने महाराष्ट्रातील ठाणे येथील ज्युपिटर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली असता तिचे यकृत पूर्णतः निकामी झाल्याचे आढळले. मग तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तोपर्यंत तिच्याविरुद्ध मायणा कुडतरी पोलिसांनी आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला. त्याबाबतच्या तपासासाठी एक पोलिस अधिकारी ठाण्याला रवाना झाला. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने संबंधित अधिकाऱ्याला तिची जबानी नोंदवणे शक्य झाले नाही. मग तो गोव्यात परतला. तिच्या प्रकृतीत सुधारणा न होता उलट ती ढासळत चालल्यावर ठाणे पोलिसांनी नंतर तेथील न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांकरवी तिची मृत्युपूर्व जबानी नोंदवली होती.
तिने रेटॉलची पूर्ण ट्यूब गिळल्याने तिचे यकृत निकामी झाले होते. त्यामुळे तिच्यावर यकृत रोपणाची शक्यता पडताळून पाहण्यात आली. चेन्नईत एक यकृतदाता भेटल्याने गेल्या आठवड्यात तिला चेन्नईला हालवण्यात आले. त्यावेळी तिच्या सोबत तिची आई - भाऊ व तिचा राजकारणी मित्रही होता.
दरम्यानच्या काळात मडगावहून तिची जबानी घेण्यासाठी राजू राऊत देसाई या पोलिस निरीक्षकाला ठाणे येथे पाठवण्यात आले. मात्र त्यांनाही तिची जबानी नोंदवता आली नाही. त्यामुळे नीलेश सामंत या अन्य अधिकाऱ्यास चेन्नईत पाठवण्यात आले. त्यांनाही तिची जबानी नोंदवता आली नाही. कारण ठाण्याहून हलविताना बेशुद्धावस्थेत गेलेली ती महिला पुन्हा शुद्धीवरच आली नाही, असे कळते.
आज रविवार असल्याने उद्या सोमवारी तिची शवचिकित्सा केली जाईल व नंतर मृतदेह मडगावात आणला जाईल असे समजते. तिला ठाणे येथून चेन्नईला हलवताना तेथे असलेला तिचा राजकारणी मित्र नंतर कुठे गेला ते कळले नाही. पोलिसांनीही तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. आज दक्षिण गोव्यात हाच चर्चेचा विषय बनला होता.
हा खुनाचाच प्रकारः "सवेरा'
दरम्यान "सवेरा' या महिलांच्या कल्याणासाठी वावरणाऱ्या बिगर सरकारी संघटनेच्या प्रमुख तारा केरकर व "सिटिझन फोरम फॉर वुमेन राईटस्'च्या हीना शेख यांनी आज सायंकाळी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत, हा नैसर्गिक मृत्यू नसल्याचा दावा केला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्याच्या प्रयत्नात वैद्यकीय उपचार वेळेवर मिळू न शकल्याने जाणूनबुजून केलेला खून असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
श्रीमती केरकर व श्रीमती शेख म्हणाल्या, की या घटनेत एका राजकारण्याचे नाव घेतले जात आहे. त्यामुळेच पंधरवडा उलटला तरी याप्रकरणी कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री व अन्य मंत्री नेहमीच महिला कल्याणाच्या वल्गना करतात. आता एका बड्या नेत्यावर या प्रकरणी आरोप होत असताना सारेच मूग गिळून गप्प आहेत.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सदर प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून संबंधित नेत्यावर कठोर कारवाई करावी. त्यासाठी आम्ही त्यांना दोन दिवसांची मुदत देत आहोत. माहितीहक्क कायद्याखाली या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आपण मागितली आहेत. ती हाती येताच पुढील कृती केली जाईल. वारंवार इस्पितळे का बदलली, संबंधित महिलेवर कुठल्या ठिकाणी कोणते उपचार झाले आदी तपशील उघड होणे आवश्यक आहे, असेही श्रीमती केरकर व श्रीमती शेख म्हणाल्या.
सदर महिलेच्या पतीने यापूर्वीच आपल्या पत्नीला एक नेता सतावत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. तथापि, त्या नेत्याच्या धाकामुळे पोलिसांनी ती दाखल करून घेतली नसल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. या महत्त्वपूर्ण मुद्याकडेही सदर पत्रपरिषदेत लक्ष वेधण्यात आले. याप्रकरणी आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत, असेही याप्रसंगी सांगण्यात आले.

No comments: