Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 June 2010

लोकांना घाबरणारे हे कसले मुख्यमंत्री?

निवृत्त शिक्षकांचा संतप्त सवाल
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): "आम्ही म्हातारे झालेलो आहोत असे सरकारने समजू नये.
सरकारच्या १४४ कलमाला घाबरलो आहोत असेही समजू नका, मुख्यमंत्र्यांना लोकांची भीती वाटत असल्यास त्यांनी राजकारण सोडावे', असा संतप्त सल्ला आज पणजी येथे गेल्या चार दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या निवृत्त शिक्षकांनी दिला आहे. जुन्या सचिवालयाजवळ उपोषणासाठी शिक्षकांनी ठाण मांडले असून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर हा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शरीराने आम्ही वृद्ध दिसत असलो तरी अद्याप लढा देण्याची धमक आमच्यात आहे. आम्ही भेटायला येणार म्हणून मुख्यमंत्री कामत यांनी १४४ कलम लावून रस्त्यावरच आम्हाला अडवले. आम्ही काय दरोडेखोर होतो की, गुन्हेगार असा खडा सवाल पिडीत शिक्षक मंचाचे अध्यक्ष नेविस ऍन्थनी रिबेलो यांनी केला. ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त शिक्षकांना हे सरकार अशी वागणूक देते. हेच काय त्यांचे "आम आदमी'चे सरकार, असेही श्री. रिबेलो म्हणाले.
मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आम्ही हार मानणार नाही. शेवटपर्यंत लढा सुरू ठेवणार आहेत, असे मंचाचे उपाध्यक्ष सी के. मॅथिव म्हणाले. मुख्यमंत्री कामत यांच्या पणजी येथील सरकारी निवासस्थानी जाणारा या निवृत्त शिक्षकांचा मोर्चा अडवल्यानंतर या शिक्षकांनी जुन्या सचिवालयाजवळ साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज तिसवाडी तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी उपोषण केले तर, उद्या बार्देश तालुक्यातील शिक्षक उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली
५८ वर्षी निवृत्त करून आमच्यावर अन्याय केल्याचे मत श्री. रिबेलो यांनी यावेळी मांडले. आम्ही निवृत्त झाल्यानंतर सरकारने पुन्हा ६० वर्षे निवृत्तीवय केले. त्यामुळे दोन वर्षाची वेतनवाढ आम्हाला मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाचाही लाभ मिळालेला नाही, असा दावा करून तो लाभ सरकारने त्वरित द्यावा, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे.

No comments: