पुणे दि. २९ (प्रतिनिधी) - देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबरोबरच गोवामुक्तीतही सक्रिय सहभाग घेतलेले, राजकारणाच्या रणधुमाळीतही ऋजुता आणि साधनसुचिता यांना आयुष्यभर विलक्षण महत्त्व देणारे प्रा. गणेश प्रभाकर उपाख्य ग. प्र. प्रधान यांचे आज पहाटे पाच वाजता हडपसर येथे साने गुरुजी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते.
बारा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी डॉ. मालविका प्रधान यांचे निधन झाल्यावर त्यांनी पुण्याच्या सदाशिव पेठेतील आपले घर साधना ट्रस्टला दिले व आपला मुक्काम संस्थेच्या हडपसर येथील सानेगुरुजी केंद्रात हलवला होता. तेव्हापासून ते तेथेच राहात होते. पुण्यातही क्वचित येत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी अन्नत्याग करायाचा निर्णय घेतला होता; पण मित्रांच्या विनंतीवरून तो मागे घेतला. गेलेे महिनाभर त्यांना अशक्तपणा जाणवत होता. गेले तीन दिवस सतत त्यांना श्वास घेण्यात अडथळे येत होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयात सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ठेवण्यात आला होता. त्यांनी मरणोत्तर देहदान केले असल्याने पाच वाजता तो पार्थिव देह हडपसार आयुर्वेद महाविद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आला. सायंकाळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांची रीघ लागली होती. दुपारी दोन वाजता महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राज्यशासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रतिभासंपन्न लेखक, साक्षेपी संपादक, मृदुमनाचे समाजसेवक, लढवय्ये राजकारणी व विद्यार्थीप्रीय प्राध्यापक असे त्यांचे वर्णन केले जायचे. ते वीस वर्षे म्हणजे १९४५ ते ६५ दरम्यान फर्गसन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते पण आपला इंग्रजीचा क्लास संपला की, फर्गसन महाविद्यालयातून जाणाऱ्या पाण्याच्या पाटाभोवती तरुण पिढीला गोळा करून स्वातंत्र्यचळवळी अभ्यासवर्ग घेत. स्वातंत्र्यानंतर गोवामुक्ती व नंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन या आंदोलनाचे धडे त्यांनी येथेच मुलांना दिले. १९६६ पासूनअठरा वर्षे ते तीन वेळा विधानपरिषदेवर पदवीधर प्रतिनिधी म्हणून निवडून आले. १९८५ मध्ये ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले; पण त्यांनंतर १९९८ ते "साधना' साप्ताहिकाचे मानद संपादक होते. त्याच काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपले राहते घरही संस्थेला देऊन वानप्रस्थ जीवन स्वीकारले होते. लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरु व गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनावर त्यांनी चरित्रात्मक ग्रंथ निर्मिती केली आहे तर स्वातंत्र्यचळवळीवर त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे मराठीखेरीज हिंदी व कानडी भाषेतही भाषांतरे झाली आहेत. साठा उत्तराची कहाणी या त्यांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाला भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार मिळाला होता.
Sunday, 30 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment