उपचारांवर ३० लाख खर्च; कोणत्याही क्षणी "त्या' नेत्याची जबानी घेणार
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या नादिया तोरादो या महिलेवर वैद्यकीय उपचारासाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च झाल्याची माहिती हाती आली असून एवढा मोठा खर्च कोणी उचलला याची चौकशी केली जात आहे. ज्या प्रकारे नादियाला मुख्यमंत्र्याची खास परवानगी घेऊन सरकारच्या खर्चाने मुंबईत हालवण्यात आले, त्यावरून या सर्व घटनांमागे "त्या' राजकीय व्यक्तीचाच हात असल्याबद्दल पोलिसांचीही खात्री पटली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी "त्या' नेत्याची जबानी नोंद करून घेतली जाईल, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.
दरम्यान, नादिया हिचा मृतदेह आज सायंकाळी चेन्नईहून विमानाने गोव्यात आणण्यात आला. यावेळी मिकी पाशेको ट्रस्टच्या शववाहिकेतून तिचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या शवागरात नेण्यात आला. तिच्यावर अंत्यसंस्कार करेपर्यंत मृतदेह त्याठिकाणी ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
दाबोळी विमानतळ ते बांबोळी इस्पितळापर्यंतच्या प्रवासात सदर शववाहिकेला पोलिस संरक्षणही पुरवण्यात आले होते. तसेच, पर्यटन खात्याचेही एक वाहन तेथे उपस्थित होते. या वाहनाचा क्रमांक जीए ०७ सी ५६२० असा असून हे वाहन "महिंद्र लोगन' होते.
दरम्यान, नादियाच्या मृत्यूनंतर दक्षिण गोव्यात खळबळ माजली आहे. अनेकांना "त्या' नेत्याबद्दल माहितीही मिळाली आहे. परंतु, कोणीही त्याच्या विरोधात रस्त्यावर येण्याचे धाडस करीत नसल्याने महिला संघटनाही सावध पावले टाकत आहेत. चेन्नईत झालेल्या शवचिकित्सेचा अहवाल गोवा पोलिसांच्या हाती आला असून शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने नादियाचा मृत्यू झाला असल्याचे कारण त्यात देण्यात आले आहे. तिचे यकृत पूर्ण निकामी झाले होते. त्यामुळेच नवीन यकृत रोपण करण्यासाठी मुंबईतील इस्पितळातून तिला चेन्नई येथे हालवण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
नादियाचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. नंतर पतीने तिला घटस्फोट घेण्याची तयारी चालवली होती. तसा अर्जही करण्यात आला होता. मात्र घटस्फोट होऊ शकला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. केवळ पाच वर्षांत पतीपत्नीचे संबंध घटस्फोटापर्यंत कसे आले, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत.
आज तिचा मृतदेह दाबोळी विमानतळावर आणला असता यावेळी मृतदेह नेण्यासाठी आलेल्या मिकी पाशेको ट्रस्ट शववाहिकेच्या चालकाने तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांशी बाचाबाची केली. "कोणी सामान्य व्यक्ती असती तर तुम्ही येथे आले असता का,' असा प्रश्न त्याने पत्रकारांना विचारला. त्यावेळी "मृत महिला सामान्य नाही आणि तिच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठीच आम्ही येथे आले आहोत,' असे उत्तर देताच तो चालकही क्षणभर ओशाळला.
Tuesday, 1 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment