म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी): कोलवाळ बिनानीजवळील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीच्या गोदामाला आग लागून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाचे नितीन रायकर यांनी दिली.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दोन वाजता ग्लॅनमार्क कंपनीच्या शेजारी असलेल्या आशापुरा एन्टरप्रायझेसचे मालक अर्जुन गडवी यांच्या मालकीच्या दोन सामानांच्या गोदामाला व एक स्क्रेप गोदामाला आग लागून सारे सामान आगीत भस्मसात झाले. त्याच बरोबर गोदामाच्या भिंतींना तडे गेले, छप्परावरील सिमेंटचे पत्रे जळून खाक झाले. आशापुरा एन्टरप्रायझेसचे मालक ग्लेनमार्क कंपनीचे सब कॉंट्रेक्टर म्हणून काम करीत आहेत. ग्लेनमार्क कंपनीचे सामान या गोदामात ठेवले जाते. आज अचानक दुपारी दोनच्या सुमारास शॉटसर्किट होऊन गोदामाच्या मागच्या बाजूला आग लागली. हे काही माणसांनी पाहिल्यानंतर कामगारांना कल्पना देण्यात आली. गोदामात सर्व प्लास्टिकच्या वस्तू, पुठ्ठे, प्लास्टिक स्क्रॅप, टूथपेस्टचे प्लास्टिक अशा तऱ्हेचे सामान असल्याने आग भडकली. याबाबतची कल्पना अग्निशामक दलाला २ वाजता मिळाली. २.५० वाजता अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले.
काही वेळातच संबंध गोदामाने पेट घेतला. ही आग अन्य तीन गोदामांत पसरली. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते, पण आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी पणजी, पेडणे, डिचोलीहून पाण्याचे बंब मागवले. सुमारे अडीच तास पाण्याचे १२ बंब आणि सुमारे चाळीस अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पाठीमागे गोदामाला आग लागली असताना कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने दुसऱ्या गोदामातील कागदी पुठ्ठे, प्लास्टिक आदी सामान बाहेर काढण्यात आले. या घटनेचा पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.
Wednesday, 2 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment