वास्को, दि. ३० (प्रतिनिधी)- सुट्टीच्या निमित्ताने आज संध्याकाळी वेळसांव समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघा जणांचा तेथे बुडून मृत्यू झाला. मरण पावलेल्या युवकांचे नाव इलियास अहमद खतीब (१९ वर्षे) व नितेश (बाबलेश) साळसकर (२३ वर्षे), दोघे उपासनगर- सांकवाळचे रहिवासी असून त्यांचा बुडत असलेला तिसरा मित्र विठ्ठल राठोड हा सुदैवाने बचावला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. उपासनगर येथील इलियास खतीब, नितेश साळसकर व विठ्ठल राथोड तसेच आशा डोंगरी, चिखली येथील इम्रान शेख (वय २१) असे चार मित्र आज संध्याकाळी सुट्टी असल्याच्या निमित्ताने आंघोळीसाठी वेळसांव येथील समुद्रात गेले असता इम्रान वगळता इतर तीनही मित्र समुद्रात आंघोळ घेण्यासाठी उतरले. काही वेळानंतर सदर तीनही मित्र गटांगळ्या खायला लागले. त्यापैकी विठ्ठल पोहत पाण्यातून बाहेर आला व त्याने येथे असलेल्या जीवरक्षकांना आपल्या बुडत असलेल्या मित्रांबाबत माहिती दिली. वेळसांव समुद्रात दोन युवक बुडत असल्याचे येथे असलेल्या जीवरक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पाण्यात जाऊन बुडत असलेल्या इलियासला तसेच नितेश यास बाहेर काढून नंतर दोघांना उपचारासाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात दाखल केले. समुद्रात बुडाल्याने गंभीररीत्या प्रकृती बिघडलेल्या इलियास व नितेश यांना इस्पितळात नेण्यात आले असता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरकडून घोषित केले. वेर्णा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला.
उपासनगर येथील सर्वांच्या परिचयाचे दोन मित्र असे आकस्मिक रित्या मरण पावल्याने सध्या या भागात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
Monday, 31 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment