Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 3 June 2010

'गोवा अर्बन' कर्मचारी संघटनेचे उद्या धरणे

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): गोवा अर्बन सहकारी बॅंक व्यवस्थापनाकडून महिला कर्मचाऱ्यांच्या सामूहिक बदली आदेशाविरोधात गोवा अर्बन बॅंक कर्मचारी संघटना येत्या ४ रोजी बॅंकेच्या मुख्यालयासमोर निषेध धरणे कार्यक्रम करणार आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांप्रित्यर्थ संपावर गेल्यावरून व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांची लांब पल्ल्याच्या ठिकाणी बदली केली आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क डावलून उलट त्यांचीच सतावणूक करण्याचा हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संघटनेचे सचिव फ्रान्सिस सुवारीस यांनी दिला आहे.
गोवा अर्बन बॅंक कर्मचारी संघटनेचा वेतन करार २००३ साली संपुष्टात आला आहे. नव्या वेतन करारावर सही सोडाच पण २००३ सालापासून वेतनवाढ देण्यासही व्यवस्थापन राजी नसल्याने कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. वारंवार विनंती, निवेदने सादर करूनही व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेतर्फे बेमुदत संप घोषित करण्यात आला होता. याप्रकरणी उप कामगार आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यानंतरच हा संप स्थगित ठेवण्यात आला. मध्यंतरी व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात महिला कर्मचाऱ्यांच्या लांब पल्ल्याच्या बदल्यांचा आदेश जारी केला. संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहत्या घराच्या जवळची शाखा देण्यात आली तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना लांब शाखेत पाठवण्यात आले. या सतावणुकीविरोधात उप कामगार आयुक्तांनीही बॅंक व्यवस्थापनाला खडसावले आहे.
एवढे करूनही हा आदेश मागे घेण्यास हयगय केली जात असल्याने गोवा बॅंक कर्मचारी संघटनेतर्फे गोवा अर्बन बॅंकेच्या सर्व शाखांसमोर पुढील काळात निषेध धरणे कार्यक्रम आयोजित केला जाईल. दरम्यान, येत्या काळात सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या १ ऑगस्ट २०१० पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे व त्याला गोवा बॅंक कर्मचारी संघटनेने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

No comments: