डाव्यांना 'लाल बावटा'
कोलकाता, दि. २ : कोलकाता महापालिका निवडणुकीत डाव्या पक्षांना धूळ चारून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यांनी १४१ पैकी ९८ जागा जिंकल्या आहेत.
राज्यात सत्तारूढ असलेल्या डाव्या आघाडीला या मनपा निवडणुकीत केवळ ३१ जागांवरच समाधान मानावे लागले. केवळ कोलकाताच नव्हे तर बिधाननगर सॉल्ट लेक महापालिका निवडणुकीतही तृणमूल कॉंग्रेसने लालगडावर कब्जा केला. २५ पैकी १८ जागा जिंकत तृणमूलने स्पष्ट बहुमत मिळविले. कॉंग्रेस पक्षाची या निवडणुकीत बरीच पिछेहाट झाली. तृणमूलशी हातमिळवणी न करता, महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. त्याचा फटका कॉंग्रेसला बसला. बर्दवान जिल्ह्यातील कटवा महापालिकेत फक्त कॉंग्रेसला आपली सत्ता राखण्यात यश मिळाले.
पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुका झाल्या. सुमारे ७० टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. या निवडणुकीत तृणमूलला घवघवीत यश मिळेल, असा दावा तृणमूलच्या प्रमुख आणि केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरला आहे. या यशासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.
विधानसभा बरखास्त करा : ममता
महापालिका निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्याने प्रचंड उत्साहित असणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आता विधानसभा निवडणुकीचीही घाई झाली आहे.पश्चिम बंगालमधील माकपाचे सरकार बरखास्त करून लवकरात-लवकर निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे.
Thursday, 3 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment